मालेगावात कोरोनाचे नियम मोडणाऱ्या चित्रपटगृहावर गुन्हा! दोन दिवसांत ठोकणार सील

मालेगाव (जि. नाशिक) : नागरिकांच्या बेफिकीरी वृत्तीमुळे शहर व तालुक्यात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असतानाच  शुक्रवार (ता. १९) आठवडे बाजार सुटीचा दिवस असल्याने येथील मोहन सिनेमागृहात नव्याने प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई सागा’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रचंड गर्दी उसळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

चित्रपटगृहाला सील ठोकण्याची कारवाई

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला असतानाच चित्रपटगृहात गर्दी थोपविण्यासाठी कुठल्याही उपाययोजना न करता जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून मोहन चित्रपटगृहाचे मालक यश पांडे, व्यवस्थापक दिलीप पवार यांच्याविरुद्ध रात्री उशिरा छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.सोशल मीडियावर गर्दीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. गुन्हा दाखल झाला की नाही, हे सांगण्यासही छावणी पोलिस रात्री उशिरापर्यंत आढेवेढे घेत होते. कायदेशीर बाबी तपासून उद्या किंवा दोन दिवसांत चित्रपटगृहाला सील ठोकण्याची कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त त्र्यंबक कासार यांनी सांगितले. 

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी दोन हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळून आले. शनिवारी (ता. २०) दिवसभरात दोन हजार ३८३ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर आठ ज्येष्ठ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. दरम्याना मालेगाव येथे मात्र लोकांना परिस्थितीचे गांभिर्य लक्षात येत नसल्याचे समोर आले आहे. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा