मालेगावात कोरोनाबाधितांचा बिनधास्त संचार; गृहविलगीकरणातील रुग्णांवर नियंत्रण नाही 

मालेगाव (जि. नाशिक) : शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शासकीय व खासगी रुग्णालय हाउसफुल झाली आहेत. गृहविलगीकरणातील रुग्ण बिनधास्त हिंडत आहेत. शहर व तालुक्यातील गृहविलगीकरणातील रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. मंगळवारी (ता. ३०) महापालिका हद्दीत १२१ रुग्ण आढळले. मंगळवारी चार रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या सतराशेच्या वर आहे. 

शहरात कॅम्प, संगमेश्‍वर, सोयगाव, कलेक्टरपट्टा या भागात रोज रुग्ण आढळत आहेत. येथील मसगा व सहारा कोविड सेंटर हाउसफुल आहे. खासगी रुग्णालयातही बेड शिल्लक नाहीत. व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत. रुग्णसंख्या वाढत असतानाच विनामास्क फिरणाऱ्यांवर पुरेशी कारवाई केली जात नाही. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. महापालिका प्रशासन व आरोग्य विभागाकडून वारंवार सूचना दिल्या जात असून, अनेक बेजबाबदार नागरिक सूचनांना केराची टोपली दाखवत आहेत. 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

रावळगावला सात दिवस ‘जनता कर्फ्यू’ 

तालुक्यात रावळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्वाधिक १६६ सक्रिय रुग्ण आहेत. यातील रावळगाव व तळवाडे येथील रुग्णसंख्या अधिक आहे. पाच दिवसांत रावळगाव येथे दोन तरुणांचा मृत्यू झाला. त्यामुळे सात दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा सरपंच ॲड. महेश पवार व उपसरपंच भरत आखाडे यांनी दिला. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड