मालेगावात कोरोना निर्बंधांना चांगला प्रतिसाद; दुकाने, बाजारपेठा, प्रतिष्ठाने बंद

मालेगाव (जि. नाशिक) : जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या कोरोना निर्बंधांना येथे किरकोळ अपवाद वगळता चांगला प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी (ता.१३) अत्यावश्‍यक सेवा वगळता दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद होत्या. रस्त्यांवरची गजबज एकदमच कमी झाली होती. नागरिक मोटारसायकल व पायी फिरत होते. मात्र, पूर्व भागातील काही ठिकाणी किरकोळ दुकाने व हॉटेल सुरू होती. कॅम्प-संगमेश्‍वरच्या पश्‍चिम पट्ट्यात बंदसदृश परिस्थिती होती. 

जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी व रविवारी व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहर व परिसरात आदेशाचे पालन करण्यात आले. रुग्णालय, मेडिकल, किराणा, भाजीपाला, फळे, दूध विक्रीची दुकाने सुरू होती. या दुकानांवरही ग्राहकांची नेहमीसारखी गर्दी नव्हती. रस्त्यांवरची वाहतूक एकदमच मंदावली होती. गजबजलेल्या किदवाई रोडवर व भंगार बाजारात नागरिकांची ये-जा सुरू असली तरी सर्व दुकाने बंद होती. कॅम्प, संगमेश्‍वर, सटाणा नाका, कलेक्टरपट्टा, सोयगाव नववसाहत या भागातील सर्व व्यवहार बंद होते. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

मालेगावातील रुग्णसंख्या चिंताजनक 

शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या पंधरा दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. महापालिका हद्दीतील रुग्णसंख्या पाचशेच्या घरात गेली आहे. ग्रामीण भागात ३९ रुग्ण उपचार घेत आहेत. प्रशासनाने कठोर निर्बंध लादले असले तरी अजूनही ५० टक्के नागरिक विनामास्क फिरत आहेत. ग्रामीण भागात कोरोनाबाबत बेफिकीरी वृत्ती अधिक प्रमाणात दिसून येत आहे.  

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO