मालेगावात कोरोना प्रतिबंधाबाबत चालढकलच! आयुक्तांच्या रजेचा घोळ सुरूच, 

मालेगाव (जि.नाशिक) : महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार रजेवर गेले असताना जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द केल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केल्याने आयुक्तांच्या रजेचा घोळ सुरूच आहे. अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्याकडे कार्यभार सोपविण्याचा आदेश आला असला तरी, निकम यांनीही पदभार स्वीकारलेला नाही.

आयुक्तांच्या रजेचा घोळ सुरूच, 

कासार यांची रजा नामंजूर झाली असून, आयुक्त स्वत: शनिवारी (ता. २०) महापालिकेत हजर होणार असल्याची चर्चा होती. आयुक्त कार्यालयात मात्र याबाबतचा कुठलाही आदेश प्राप्त झालेला नव्हता. नाशिक येथे १८ मार्चला झालेल्या कोरोना आढावा बैठकीस महापालिकेतर्फे उपायुक्त नितीन कापडणीस यांनी हजेरी लावली. शहरातील सक्रिय कोरोनारुग्णांची संख्याही ८११ झाली आहे. महापालिका क्षेत्रातील रुग्ण एक हजाराच्या उंबरठ्यावर असताना अन्य शहराच्या तुलनेत येथे अद्यापही कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत.

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

परिस्थिती गंभीर होण्याची भीती 

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतच असंख्य जण सर्रासपणे विनामास्क फिरतात. पूर्व भागात मास्क नावालाही दिसत नाही. लसीकरणासही प्रतिसाद नाही. पश्‍चिम भागातच पोलिस सक्ती करताना आढळत आहेत. पूर्व भागातील किदवाई रोड, मोहंमद अली रोड, आझादनगर या प्रमुख रस्त्यांवरील दुकाने सायंकाळी सातला बंद होतात. उर्वरित दुय्यम रस्त्यावरील दुकाने रात्री उशिरापर्यंत सर्रास सुरू असतात. यातून पूर्व-पश्‍चिम भागातील व्यापाऱ्यांमध्येही असंतोष निर्माण झाला आहे. पोलिस व महापालिका प्रशासनाने कठोरपणे कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कठोर उपाययोजना न केल्यास येथील परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.  

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा