मालेगावात कोरोना लसीकडे मुस्लिम ज्येष्ठ नागरिकांची पाठ; आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान

मालेगाव (जि. नाशिक) : सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी १ मार्चपासून कोरोनावर मोफत लस देण्यास सुरवात केली आहे. राज्यात या अभियानाला प्रतिसाद मिळत असताना मालेगाव शहरातील मुस्लिम बहुल पूर्व भागात निरुत्साह आहे. पहिल्या पाच दिवसांत शहरात ४५९ ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली. मात्र यात ७० टक्के लोकसंख्या असलेल्या मुस्लिम समाजातील ज्येष्ठांचे लसीकरण करणे शहरासह जिल्हा आरोग्य यंत्रणेला आव्हानात्मक ठरणार आहे. 

शहरात सोयगाव, कॅम्प, निमा, वाडिया व आरोग्याधिकारी कार्यालय अशा पाच ठिकाणी मोफत लसीकरण केले जात आहे. पाचही केंद्रांवर लसीकरणाच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. शहराच्या पश्‍चिम भागातील कॅम्प, संगमेश्‍वर, सोयगाव, नववसाहत, कलेक्टरपट्टा या भागातील नागरिक स्वयंस्फूर्तीने केंद्रावर जाऊन लस घेत आहेत. उलट पश्‍चिम भागातील मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक लसीकरणाला फारसे उत्सुक दिसत नाहीत. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यात मालेगावचा पूर्व भाग हॉटस्पॉट ठरला होता. एप्रिल ते जून २०२० या काळात आढळलेले ९० टक्के रुग्ण मुस्लिम बहुल भागातील होते. जुलै २०२० पासून कोरोनाने कॅम्प संगमेश्‍वरच्या पश्‍चिम पट्ट्यात पाय पसरविले. नऊ महिन्यांपासून या भागात रुग्ण आढळत आहेत. याउलट पूर्व भागातून जणू कोरोना हद्दपार झाला आहे. सहा महिन्यांपासून या भागात अत्यल्प रुग्ण आढळले. मुळात नागरिक चाचण्याच करत नसल्याचे चित्र आहे. 

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

घरोघरी जाऊन जनजागृती करणार 

आरोग्य विभाग घरोघरी जाऊन कोरोना लसीबाबत जनजागृती करणार आहेत. ज्येष्ठांना लसीबाबत, तसेच ती घेण्यासंदर्भात आवाहन केले जाणार आहे. आशासेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून हे काम करून घेतले जाणार आहे. सोमवार (ता. ८)पासून येथील कॅम्प दवाखाना, संगमेश्‍वर, गुरुवार वॉर्ड, गोल्डननगर, आयेशानगर, मदननीनगर, गयासनगर, अब्बासनगर, सोमवार वॉर्ड, अली अकबर हॉस्पिटल, रमजानपुरा आदी भागातील आरोग्य नागरी केंद्रांमध्ये कोरोनाची मोफत लस दिली जाणार आहे. लसीचे केंद्र वाढविल्यानंतर मुस्लिम बहुल भागातील ज्येष्ठांकडून किती प्रतिसाद मिळतो, हे आठवडाभरात दिसून येईल. 

शहरात पाच केंद्रातून ज्येष्ठांना मोफत लस दिली जात आहे. सोमवारपासून केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी स्वत:च्या आरोग्यासाठी लस घेणे आवश्‍यक आहे. 
-डॉ. सपना ठाकरे, आरोग्याधिकारी, मालेगाव 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा