मालेगावात कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’ यशस्वी; २६ आरोग्य कर्मचाऱ्यांची निवड

मालेगाव (जि. नाशिक) : महापालिकेच्या मदनीनगर नागरी आरोग्य केंद्रात शुक्रवारी (ता. ८) कोरोना प्रतिबंधासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड लसीकरणासाठीचा ड्राय रन (रंगीत तालीम) यशस्वीरीत्या झाला. महापौर ताहेरा शेख व आयुक्त त्र्यंबक कासार यांच्या हस्ते फीत कापून या मोहिमेची सुरवात झाली. लसीकरणासाठी फ्रन्टलाइन वर्करमधील २६ आरोग्य कर्मचाऱ्यांची निवड झाली. निवड झालेल्यांना लसीकरणासंदर्भात संदेश मोबाईलवर प्राप्त झाला होता. 

महापौर, आयुक्तांची उपस्थिती 

लसीकरण लाभार्थीपैकी प्रथम डॉ. फैमिदा अन्सारी यांना सुरक्षारक्षकामार्फत सॅनिटाइझ करून नावनोंदणीची पडताळणी झाली. त्यानंतर लाभार्थीचे ऑक्सिजन सॅच्युरेशन, तापमान, थर्मल गन व पल्स ऑक्सिमीटरने तपासणी झाली. रजिस्टर नोंदीनंतर संबंधितांना प्रत्यक्ष लसीकरण कक्षात पाठवले गेले. महापालिकेने तीन लसीकरण तज्ज्ञांची नियुक्ती केली होती. लाभार्थ्यास जुने आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब आहे किंवा कसे, याबाबत माहिती घेऊन तज्ज्ञांमार्फत समुपदेशन झाले. तद्‌नंतर प्रत्यक्ष चाचणी करण्यात आली. 
महापौर शेख यांनी नागरिकांनी लसीकरणाला न घाबरता सहकार्य करावे, लसीकरणातून कोरोनावर मात केली जाईल. लसीकरणाबाबत कुठलाही अपप्रचार करू नये, असे सांगितले. कासार यांनी सर्व समाजघटक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शंभर टक्के लसीकरण यशस्वीपणे पूर्ण करू, असा विश्‍वास व्यक्त केला. 

हेही वाचा > नियतीची खेळी! एका मित्राला लागली हळद ,तर दुसऱ्याला दिला अग्नि; अक्षयच्या अवेळी जाण्याने परिसरात हळहळ

स्थायी समिती सभापती राजाराम जाधव, उपायुक्त नितीन कापडणीस, महापालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे, डॉ. हितेश महाले, युनिसेफचे डॉ. गाडेकर, डॉ. अलका भावसार, डॉ. शिरसाट, डॉ. पंकज शिंपी, दत्तात्रेय काथेपुरी, विद्युत अधीक्षक अभिजित पवार, सचिन महाले, मंगेश गवांदे, इतर वैद्यकीय अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

हेही वाचा > माहेरहून सासरी निघालेली विवाहिता चिमुकलीसह प्रवासातच गायब; घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला धक्काच

अशी झाली प्रक्रिया 

ही फक्त लसीकरणाची रंगीत तालीम होती. प्रत्यक्षात लस व इंजेक्शन दिले जात नाही. लाभार्थीस शेजारील निरीक्षणगृहात वैद्यकीय अधिकारी व नर्स यांच्या देखरेखीत अर्धा तास ठेवण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी, आशासेविका यांचा भ्रमणध्वनी क्रमांक देऊन घरी पाठविण्याची प्रक्रिया पार पडली. निरीक्षणाच्या कालावधीत लाभार्थ्यास त्रास जाणवल्यास किंवा लसीकरणानंतर काही प्रतिकूल घटना घडल्यास आपत्कालीन कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. नागरी आरोग्य केंद्राबाहेर रुग्णवाहिका सज्ज होती.