मालेगावात खंडेरायाच्या ‘कोटम’ प्रथेवर कोरोनाचे सावट; शेकडो वर्षाची परंपरा खंडित

नाशिक : जेजुरीनंतर खंडोबा महाराजांचे चंदनपुरी देवस्थान मालेगाव तालुक्यातील आणि कसमादे पट्ट्यातील जागरूक देवस्थान असून, याठिकाणी शेकडो वर्षांपासून  कुठल्याही कुटुंबातील विवाह सोहळ्याची सुरुवात ही येथे कोटम दिवट्या बुधल्या केल्याशिवाय होत नाही. प्रचलित प्रथा आहे आणि यामुळे दरवर्षी आणि वर्षभरच कोटम, तळी भरणे,आणि दिवट्या बुधल्याच्या कार्यक्रमाची चांगलीच रेलचेल असते. मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकटामुळे यात्रोत्सव आणि वर्षभरातील सर्वच कार्यक्रम रद्द करावे लागल्याने छोट्या मोठ्या व्यावसायिकापासून स्थानिकांना रोजगार बुडाला असून आर्थिक संकटांना तोंड देण्याची वेळ आली आहे

चंदनपुरी यात्रेला हजारो भाविक दरवर्षी होतात दाखल.

दरवर्षी पौष पौर्णिमेपासून पंधरा दिवस यात्रोत्सव भरतो. यंदा कोरोनाच्या संकटामुळे  यात्रोत्सावास बंदी घालण्यात आली आहे.  गावातून ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक निघाली. महापूजा, महाआरती केली. यावेळी तळी भरण्यात आली. त्यानंतर मंदिर परिसरात भंडारा उधळून 'यळकोट, येळकोट जयमल्हार', 'बोल खंडेराव महाराज की जय' असा जयघोष करण्यात आला. राज्यभरातून अल्पशा प्रमाणात मल्हारभक्त दर्शनासाठी दाखल होण्याची शक्यता आहे.  व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. मात्र यावर्षी यात्रोत्सव रद्द झाल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान अंगावर घेउन येथील व्यावसायिक पुढील वर्षीच्या यात्रेत भर काढू या आशेवर आपला दिनक्रम सुरू ठेवला आहे

ग्रामीण भागात दरवर्षी आपल्या कुटुंबात सुख शांती लाभावी कुठलेही संकट येवू नये म्हणून तळी भरण्याची प्रथा शेकडो वर्षांपासून प्रचलित असून आमचे एकत्रित कुटुंब असल्याने आम्ही दरवर्षी कोटम,तळी भरण्यासाठी चंदनपुरी येथे असतो व खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होत असतो- शेखर आहिरे
गिलाणे (ता. मालेगाव)