मालेगावात गॅंगवॉर! पोलिसांना टीप दिली म्हणून दोघांवर गोळीबार; शहरात दहशतीचे वातावरण

मालेगाव (जि. नाशिक) : येथे अगदी चित्रपटाच शोभावा असा प्रसंग आज शहरात घडला, भर दुपारी शहीद गांजावाला टोळीतील बारा ते पंधरा जणांनी सराईत गुन्हेगार इब्राहीम खान इस्माईल खान याच्यासह दोघांवर गोळीबार व चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली, या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. 

नेमके काय घडले?

इब्राहीम खान  (28, रा. नागछाप झोपडपट्टी) हा मित्रांसह ताज हाॅटेलवर चहा पीत बसला असताना दुचाकीवर आलेल्या शहीद गांजा, मसुद गांजा, जाहीद गांजा, फिराेज गांजा, मोईन काल्या आदींसह 12 ते 15 जणांच्या टोळीने त्यांना चोहोबाजूने घेरुन चाकूने वार करीत गोळीबार केला. संशयितांनी गोळीबाराच्या सात ते आठ फैरी झाडल्याचे इब्राहीमने सांगितले. त्याच्या पायाला गोळी लागली असून त्याचा साथीदार अबरार शेख (24, रा. आयेशानगर) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. दोघांवर हल्ला करुन हल्लेखोरांची टोळी पसार झाला. या भागातील रहिवाशांनी दोघा जखमींना सामान्य रुग्णालयात दाखल केले. 

संशयितांचा शोध सुरु

घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय महाजन, सहाय्यक निरीक्षक निकम व सहकारी घटनास्थळी पोचले. पोलिसांनी संशयितांची माहिती घेत दुरसंदेश यंत्रणेद्वारे शहरातील विविध पोलिस ठाण्यात कळविली. इब्राहीम खान याच्या तक्रारीवरुन रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दंगलीचा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. पाेलिसांनी शहरात नाकाबंदी केली असून संशयितांचा शोध सुरु आहे.

शहरात गुन्हेगारी वाढली.. 

शहरातील गुन्हेगारांनी डोके वर काढले असून गेल्या वर्षभरात गोळीबाराची ही पाचवी घटना आहे. या हल्ल्यात जखमी झालेला इब्राहीम खान सराईत गुन्हेगार आहे. मध्यंतरी जेलमधून सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी बॅनर लावून त्याचे स्वागत केले. दुचाकीवर फिरुन हुल्लडबाजी करीत दहशत निर्माण व्हावी म्हणून हवेत गोळीबार केला. इब्राहीम याने शाहीदच्या गांजा व्यवसायाबद्दल पोलिसांना टीप देत त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यास भाग पाडून गुन्हा दाखल केला होता. त्याचा सूड म्हणूनच शाहीद गांजावाला टोळीने आज हा हल्ला केल्याचे बोलले जाते.