मालेगावात निर्बंधाविरोधात राजकीय पक्ष, व्यापारी आक्रमक; काँग्रेसचे धरणे आंदोलन, जनता दलाचे जेल भरो 

मालेगाव (जि. नाशिक) : कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक दी चेन आदेशान्वये अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिल्याने व्यापारी आक्रमक झाले आहेत. त्यातच मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होत असल्याने संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहेत. निर्बंधांविरोधात काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने किदवाई रस्त्यावर बुधवारी (ता. ७) मोर्चा काढून धरणे आंदोलन केले.

प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले. जनता दल नेते नगरसेवक मुश्‍तकीम डिग्निटी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जेल भरो आंदोलन केले. भाजपप्रणीत व्यापारी आघाडी व विविध संघटनांनी मंगळवारी निवेदन देत निषेध नोंदविला. 

निर्बंधांमुळे लघु व्यावसायिक व विविध आस्थापना संकटात सापडल्या आहेत. अनेकांचे आर्थिक गणित चुकले असून, व्यापारी, दुकानदार, कामगार या सर्वांनाच त्याची झळ बसली आहे. लघु व्यावसायिकांना काही प्रमाणात सूट मिळावी, नियमांत शिथिलता आणावी, अशी मागणी शेख यांनी केली. जाचक निर्बंधांमुळे ८० टक्के कामगार असलेल्या शहरातील लघु व्यावसायिक उद्‌ध्वस्त होतील. प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून व्यावसायिकांना परवानगी द्यावी, अशी मागणी शेख यांनी केली. किदवाई रस्त्यावरील पक्ष कार्यालयापासून जेएटी विद्यालयापर्यंत मोर्चा काढून त्यांनी धरणे दिले. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय महाजन, सहाय्यक निरीक्षक मनोहर पगार, शैलेश पाटील व सहकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनात नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे, जैनू पठाण, जावेद शेख आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

आंदोलनकर्त्यांविरुद्ध गुन्हा 

जनता दल व हॉकर्स युनियनने किदवाई रस्त्यावर दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला असता, पोलिस व आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. निर्बंधांना विरोध करीत आंदोलन करणारे मुश्‍तकीम डिग्निटी, रिजवान खान, नगरसेवक मन्सूर अहमद, अब्दुल बाकी आदींसह तीसहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. काही कालावधीनंतर या कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली. कोरोना प्रतिबंधात्मक नियम झुगारून आंदोलन करणाऱ्या काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख, जनता दलाचे नगरसेवक मुश्‍तकीम डिग्निटी यांच्यासह दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.  

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन