मालेगावात ‘प्लॉस्टिक पार्क’बाबत केंद्र सकारात्मक – खासदार गोडसे

नाशिक  : जिल्ह्यातील मालेगाव शहरात जवळपास तीनशे प्लॉस्टिक उत्पादक कारखाने आहेत. त्यामुळे मालेगावातील प्लॉस्टिक उद्योगाला अधिकची गती मिळावी, यासाठी मालेगावात ‘प्लॉस्टिक पार्क’ होणे गरजेचे आहे. प्लॉस्टिक पार्क उभारला तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार आहे. मालेगाव येथे प्लॉस्टिक पार्कची उभारणी व्हावी, यासाठी आज खासदार हेमंत गोडसे यांनी रसायन व खत मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री सदानंद गोडा यांची दिल्ली येथे खास भेट घेतली.

मालेगाव येथील प्लॉस्टिक उद्योगाची मला चांगली माहिती आहे. मागणी न्यायिक असल्याने प्लॉस्टिक पार्क बाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे ठोस आश्वासन गोडा यांनी दिले. 

मालेगावात प्लॉस्टिक पार्क उभारण्याची मागणी

अनेक वर्षांपासून मालेगाव शहरात मोठ्याप्रमाणावर प्लॉस्टिक उद्योग कार्यान्वित आहेत. मालेगाव शहरापासून साधारण तिनशे किलोमीटर अंतरावर मुंबई, पुणे, इंदूर, सुरत, अमरावती, बीड, सोलापूर ही महत्त्वाची शहर आहेत. मालेगावपासून गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगना ही राज्य देखील समसमान अंतरावर जोडली जातात. राज्यभरात केंद्राकडून ‘स्वच्छ भारत’ मिशन राबविण्यात येत असून मालेगावातील प्लॉस्टिक कारखान्यांत महिनाभरात साधारण सहा हजार टन प्लॉस्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे मालेगावात प्लॉस्टिक पार्क उभारण्यात यावा, अशी मागणी मालेगावातील प्लॉस्टिक उत्पादक संघातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. याबाबत मालेगावातील काही प्लॉस्टिक उत्पादक कारखानदार यांनी यापूर्वी खासदार गोडसे यांची भेट घेवून मालेगावात ‘प्लॉस्टिक पार्क’ उभारणीची मागणी केली होती. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

खासदार गोडसे यांनी दिल्लीत रसायन व खत मंत्रालयाचे केंद्रीयमंत्री सदानंद गोडा यांची खास भेट घेउन, मालेगाव येथे प्लॉस्टिक पार्क उभारल्यास,उत्तर महाराष्ट्राच्या विकासात कशी भर पडेल याविषयी माहीती दिली. मालेगाव येथील प्लॉस्टिक उद्योग व्यवसायाची मला चांगली माहिती असून आपली मागणी न्यायिक असल्याने प्लॉस्टिक पार्कबाबत, केंद्राकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे ठोस आश्वासन गोडा यांनी दिले. 

 
मालेगावात मोठ्याप्रमाणावर प्लॉस्टिक उत्पादक कारखाने आहेत. त्यामुळे येथील कारखानदारांच्या मागणीनुसार येथे प्लॉस्टिक पार्क उभारणे गरजेचे आहे. याबाबत लवकरच केंद्राकडून निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.  - हेमंत गोडसे, खासदार नाशिक 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO