मालेगावात महिलांना नमाजी टोपीतून रोजगार; महिन्याकाठी हाताने विणतात २० हजार टोप्या

मालेगाव (नाशिक) : शहराची वेगवेगळ्या क्षेत्रांत ख्याती आहे. मालेगावच्या बाजारातील काळा साबण, लुंगी, खजूर अशा विविध वस्तू देशाच्या कान्याकोपऱ्यांत पोचतात. याच परंपरेत मुस्लिम बांधवांची नमाजासाठी वापरली जाणारी गोल टोपी महत्त्वपूर्ण आहे. या व्यवसायातून झोपडपट्टी भागामधील महिलांना रोजगार मिळतो.

जगाच्या विविध देशांत मागणी

मालेगावात जवळपास सातशे महिला महिन्याकाठी २० हजार टोपी विणण्याचे काम करतात. एका टोपीच्या मोबदल्यातून ७० ते ८० रुपये रोजगार रूपाने मिळतात.  मालेगावात २००१ पासून टोपी बनविण्यास सुरवात झाली. त्या वेळी येथील दहा ते पंधरा महिलांना टोपी डिझाइन बनविण्यासह विणण्याचे प्रशिक्षण दिले. मालेगावच्या टोपीला जगाच्या विविध देशांत मागणी आहे. या टोपीमुळे अनेक गोरगरीब व गरजू महिलांना रोजगार मिळाला आहे. २०११ पासून सौदी अरेबिया, दुबई, कुवैत, ओमान यांसारख्या देशातील नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन महिला या व्यवसायात सरसावल्या. यामुळे वाढती गरज पाहाता अनेक महिलांच्या हाताला काम मिळाले. यामध्ये मोठ्या प्रमाणात विधवा महिला टोपी विणण्याचे काम करतात.

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

मालेगावच्या टोपीची चीनशी टक्कर

भारताच्या विविध शहरात मालेगावच्या टोपीला व्यापाऱ्यांकडून पसंती दिली जाते. नमाजी टोपी म्हणून मालेगावात मुंबई, दिल्ली, बांगलादेश, इंडोनेशिया येथूनही टोप्या विक्रीला येतात. बाहेरून येणाऱ्या सर्व टोप्या या अत्याधुनिक मशिनने तयार केलेल्या असतात. त्यामुळे हस्तकलेने विकसित झालेल्या मालेगावच्या टोप्यांचे ग्राहकांना आकर्षण असते. टोपी बनविण्यासाठी पॉलिपियान या धाग्याचा प्रामुख्याने वापर केला जातो. मालेगावची टोपी ९० टक्के भारतात विकली जाते. मालेगावच्या टोपीमुळे चीनच्या टोपीची मागणी घटली आहे. चायना टोपी स्वस्त मिळत असतानाही जास्त दिवस न टिकणारी असल्याने स्वदेशी टोपी म्हणून याच टोपीचा वापर वाढला आहे. दरम्यान, लॉकडाउनमुळे निर्यात बंद असल्याने या व्यवसायाला मोठी झळ पोचली आहे. 

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

मालेगावच्या टोपीमुळे चायनाची टोपी भारतात विक्रीसाठी येत नाही. प्रामुख्याने ग्राहक मालेगावच्या टोपीची मागणी करीत असतात. त्यामुळे चायनाची टोपी भारतातून हद्दपार झाली. 
-आरीफ सईद , संचालक, मदिना लुंगी स्टोअर, मालेगाव 
 

शहरात रोजगाराचा अभाव आहे. टोपी विणण्यामुळे अनेक विधवा महिलांना रोजगार मिळाला. शासनाने या व्यवसायास पुरक अशा कौशल्यासाठी मदत केल्यास आमच्या कुटुंबाचे पुनर्वसन होईल. 
-आलिया बानो, टोपी विणणारी महिला, मालेगाव