मालेगावात लॉकाडउनविरोधात थाली बजाव आंदोलन! जनता दलाच्या महिला रस्त्यावर 

मालेगाव (जि. नाशिक) : राज्य शासनाचा जमावबंदी आदेश झुगारून जनता दल महिला आघाडीच्या शेकडो महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत येथील एटीटी विद्यालयाजवळ मंगळवारी (ता. १३) थाली बजाव आंदोलन केले. महिला रिकाम्या थाळ्या व लाटणे घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. 

आंदोलनकर्त्या महिला लाकडाउन विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या होत्या. रमजानच्या पार्श्र्वभूमीवर व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी केली. नगरसेविका शानेहिंद निहाल अहमद व साजेदा अहमद यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. स्थानिक प्रशासनातर्फे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू 

आंदोलनकर्त्यांनी 'हर घर में है खाली, डब्बा, भगोना और थाली' 'कोरोना पर वार या व्यापार पर मार' चुनाव कुंभ मे कोरोना नही, व्यापारी को भरा भगोना नही' यासह विविध घोषणा दिल्या. उपअधीक्षक लता दोंदे व शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय महाजन व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात आंदोलनकर्त्या शेकडो महिलांविरोधात जमावबंदी आदेश झुगारून आंदोलन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.  

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात