मालेगावात वाळू, गौण खनिज बेकायदा उपसा; प्रशासकीय यंत्रणेचे मात्र दुर्लक्षच

मालेगाव (नाशिक) : तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यापैकी फक्त तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे आव्हान प्रशासनासमोर आहे. महसूल, पोलिस व ग्रामविकास यंत्रणा निवडणूक कामात गुंतल्याने तालुक्यातील गिरणा, मोसमसह अन्य उपनद्यांमधून वाळूउपसा, तर तालुक्याच्या विविध भागांतून माती, मुरूम व अन्य गौण खनिजचा बेकायदा उपसा जोमात सुरू आहे. विशेष म्हणजे तीन आठवड्यांत वाळूचोरीची एकही कारवाई झालेली नाही. तसेच वितरण, विक्रीही जेमतेमच आहे. माती, मुरूम, दगड यांची विक्री धडाक्यात सुरू आहे. 

निवडणुकीच्या कामांमुळे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष 

तालुक्यात अनेक वाळूमाफियांनी विविध ठिकाणी लहान-मोठे साठे करून ठेवले आहेत. गिरणा नदीपात्रातील आघार, पाटणे, चिंचावड, दाभाडी, चंदनपुरी, सवंदगाव, तर मोसम नदीपात्रातून वजीरखेडे, म्हाळोबा मंदिर, निळगव्हाण, वडगाव, भायगाव, द्याने आदी शिवारातून वाळूचोरी सुरू आहे. रोज या वेगवेगळ्या ठिकाणाहून सुमारे दीडशे ते दोनशे ब्रास वाळू चोरी होत आहे. एरवी जेसीबीच्या मदतीने रातोरात वाळूउपसा केला जात होता. सध्या मजुरांच्या मदतीनेच वाळू काढली जात आहे. ट्रॅक्टरने वाळूविक्रीला लगाम लागला आहे. निवडणुकीत विरोधकाला संधी नको, यासाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांनीही ट्रॅक्टर अवैध वाळूविक्रीला देणे वा वाहतूक करणे बंद केले आहे. याच कारणामुळे दोन महिन्यांपासून पोलिस व महसूलची वरकमाईदेखील बंद झाली. काही ठिकाणी स्वत: वाळूमाफिया रिंगणात आहेत. त्याचाही परिणाम झाला आहे. 

बैलगाडीवर ग्रामीण भागातच वाळूविक्री सुरू

दुसरीकडे गौण खनिजचा बेकायदा उपसा व विक्री धडाक्यात सुरू आहे. तालुक्यातील अनेक टेकड्या, लहान-मोठी डोंगरे, मुरूम काढल्यामुळे उजाड व बोडकी झाली आहेत. नदीकाठच्या शेतांमध्ये वाळूचे लहान-मोठे ढीग करून बैलगाडीवर ग्रामीण भागातच वाळूविक्री सुरू आहे. शहरात चोरीची वाळू तूर्त मिळणे अवघड झाले आहे. अवैध खनिज चोरीमुळे शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मुळातच कोरोनामुळे या वर्षी शासनाला वसुलीचे उद्दिष्ट साध्य करणे जिकिरीचे झाले आहे. त्यातही गौण खनिजचे पैसे मिळत नसल्याने मार्चअखेर उद्दिष्ट कसे पूर्ण होणार, याचीही चिंता यंत्रणेला सतावत आहे. 

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप

अवैध उपशामुळे हानी 

लेंडाणे शिवारातील फुलेनगर भागात अनेक टेकड्या होत्या. अवैध मुरूम व माती उपशामुळे या टेकड्या उजाड झाल्याच. शिवाय डोंगर व टेकड्यांच्या किनारी मोठमोठे खड्डे झाले आहेत. अवैध मुरूम उपशाचे सात ते आठ ब्रासच्या वाहनांची सातत्याने वाहतूक होत असल्याने फुलेनगर ते दसाने या रस्त्याची वाट लागली आहे. रस्त्याच्या साइडपट्ट्या व रस्ताही पूर्ण खचला आहे. ज्या शिवारातून वाळूचोरी होते, तेथील रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. यापूर्वी वाळूउपशासाठी नदीकाठावर जेसीबी व अन्य यंत्रसामग्रीने कोरल्यामुळे अनेकांच्या पाइपलाइन फुटल्याचे प्रकार घडले आहेत. नदीपात्रात क्षमतेपेक्षा मोठे खड्डे झाल्याने पोहणाऱ्यांचे बळीही गेले आहेत.  

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार