मालेगावात शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद; सार्वजनिक कार्यक्रमांसाठी परवानगी आवश्यक 

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात कोरोनारुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सक्रिय रुग्णसंख्या चारशेच्या वर गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका हद्दीतील सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालये मंगळवारपासून (ता. ९) ते ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. खासगी क्लासही बंद केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अध्ययन करावे. शहरातील लग्नसोहळे व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी यापुढे प्रभाग अधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक राहणार असल्याचे महापौर ताहेरा शेख व उपायुक्त नितीन कापडणीस यांनी सोमवारी (ता. ८) पत्रकार परिषदेत सांगितले. 

ऑनलाइन शिक्षणाचा अवलंब करण्याच्या सूचना

गेल्या आठवड्यापासून शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याने पोलिस व प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी (ता. ८) सकाळी बैठक झाली. प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, आरोग्याधिकारी व खासगी डॉक्टरांच्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी केजी ते महाविद्यालयापर्यंत सर्व शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा अवलंब करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सामान्य रुग्णालय पूर्णपणे कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा विचार सुरू आहे. सहारा रुग्णालयामध्ये २०० खाटांची व्यवस्था आहे. याखेरीज रुग्णसंख्या वाढल्यास अन्य पर्यायांवर विचार केला जात आहे. महापालिका हद्दीत मास्क न वापरणाऱ्यांवर एक हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी कोरोनाबाधित व संशयित रुग्णाची माहिती तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागास कळवावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

हेही वाचा - काळजावर ठेवला दगड आणि शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली मेंढरे! स्वप्न चक्काचूर

लग्नसोहळ्यांवर बंधने 

लग्नसोहळे व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. नागरिक मास्कचा वापर करीत नाहीत. याशिवाय सामाजिक अंतर पाळले जात नाही. यापुढे मंगल कार्यालय, लॉन्समालक तसेच आयोजकांना प्रभाग अधिकाऱ्याची परवानगी घेणे आवश्‍यक आहे. लग्नसोहळे व इतर कार्यक्रमांना केवळ ५० नागरिकांनाच परवानगी दिली जाणार आहे. ५० पेक्षा अधिक नागरिक आढळल्यास मंगल कार्यालय, लॉन्समालक व वधू-वर पित्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातील कोरोनाच्या मोठ्या संकटावर शहरवासियांनी मात केली. पुन्हा रुग्णसंख्या वाढून पहिल्यासारखी परिस्थिती होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वत:ची काळजी घेत कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापौर शेख व उपायुक्त कापडणीस यांनी केले. 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर