मालेगावात सुरळीत वाहतुकीसाठी दहा सिग्नलची गरज ; नगरसेवकांनी पुढाकार घेण्याची शहरवासीयांना अपेक्षा 

मालेगाव (जि.नाशिक) : वाहतुकीबाबत बेशिस्तीचा शिक्का बसलेल्या मालेगावात वाहतूक सिग्नलच्या एका प्रयोगाने शिस्तीचा श्रीगणेशा झाला आहे. रुंद रस्त्यांच्या मालेगावात संपूर्ण वाहतूक व्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी शहरात किमान दहा सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होण्याची गरज असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. 

सुरळीत वाहतुकीसाठी दहा सिग्नलची गरज 
शहरातील मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण झाले. दुभाजकांची सोय असली तरी वाहतुकीला अतिक्रमण अडथळे ठरतात. महापालिकेचे हॉकर्स झोन कागदावरच आहेत. यंत्रमाग कामगारांचे शहर असले तरी येथे रोजगाराचा अभाव आहे. अनेक बेरोजगार हातगाडीवर व्यवसाय करतात. परिणामी रस्ते रुंद असले तरी फळविक्रेते, फेरीवाले, अनधिकृत रिक्षा थांब्यांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. अनेक समस्या असल्याने उपाययोजनांची गरज आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची संख्या चारपटीने वाढली. त्या प्रमाणात वाहतूक सुरळीत होण्याचे महापालिका व पोलिस यंत्रणेकडून नियोजन होत नाही. स्वीकृत नगरसेवक गिरीश बोरसे यांच्या प्रयत्नाने महापालिकेने मध्यवर्ती सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली. अशाच प्रकारे आदर्श ठेवून शहरातील इतर नगरसेवकांनी आपल्या भागात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

अपेक्षित सिग्नल ठिकाणे 
शहरातील वाहतुकीस खोळंबा होणाऱ्या संभाव्य चौकात सिग्नल यंत्रणा बसवावी, अशी नागरिकांची मागणी आहे. संभाव्य ठिकाणे मोहम्मद अली रोड, संगमेश्वर-रामसेतू चौक, एकात्मता चौक, रावळगाव नाका, सटाणा नाका, नवीन बसस्थानक, मच्छी बाजार, पिवळा पंप, कुसुंबा रोड, शिवाजी महाराज पुतळा. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात सिग्नल यंत्रणेसाठी स्वतंत्र तरतूद केली जाईल. महापालिका अधिकारी व पदाधिकारी, तसेच पोलिस प्रशासन यांची संयुक्त बैठक घेऊन शहरात जेथे जेथे गरज असेल, अशा ठिकाणी यंत्रणा कार्यान्वित करू. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील. - नीलेश आहेर, उपमहापौर, मालेगाव 

शहरातील नागरिकांना सिग्नलची सवय नसल्याने सुरवातीला त्रास होतोय. इतरही ठिकाणी सिग्नलची यंत्रणा कार्यान्वित केल्यास वाहतुकीला सुरळीत करण्यासाठी पोलिसांची गरज भासणार आहे. - रिजवान बॅटरीवाला, अध्यक्ष, मालेगाव अवामी पार्टी