मालेगावात हातगाड्या भरतात लाखावर लोकांचे पोट; वीस हजारांहून अधिक हातगाड्यांचा व्यवसायासाठी वापर 

मालेगाव (जि.नाशिक) : शहरातील अर्थचक्राचा बहुतांशी भार हातगाड्यांवरच्या चाकांवर अवलंबून आहे. रोज लाखो रुपयांची उलाढाल हातगाडीवरील व्यवसायांमधून होते. शहरात एक लाखापेक्षा अधिक नागरिकांचा उदरनिर्वाह हातगाड्यांवर चालतो. येथे किमान वीस हजारांवर हातगाड्यांवर विविध व्यवसाय केले जातात. यात भाजीपाला व बीफ विक्रेते आघाडीवर आहेत.

मालेगावात हातगाड्या भरतात लाखावर लोकांचे पोट

याशिवाय फळे, अंडाभुर्जी, चायनीज, बर्फी, वडापाव, नारळ, पाणीपुरी, खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, कपडे, बुटे, भंगार साहित्य, चपला, खेळणी, साबण आदी शेकडो वस्तूंची विक्री होते. मालेगावच्या अरुंद गल्ली-मोहल्ल्यांमध्ये हातगाडीचा फंडा यशस्वी झाला आहे. शहरात १९७५ पासून हातगाडी बनविण्यास सुरवात झाली. येथे चार कारखान्यांत हातगाडी बनविली जाते. शहरात यंत्रमाग कामगारांनंतर सर्वाधिक नागरिकांचा उदरनिर्वाह हातगाडीवर चालतो. सहा ते दहा हजार रुपयांपर्यंत मिळणारी ही हातगाडी सामान्य माणसाला परवडते. शिवाय दहा रुपये रोजाने भाड्याने सहज मिळते. भाड्याने हातगाडी देणारे येथे जवळपास डझनभर व्यावसायिक आहेत. येथील यंत्रमाग सोडून इतर औद्योगिक विकास झाला नाही. त्यामुळे हातगाड्यांवरील व्यवसायाला बेरोजगारांकडून प्राधान्य दिले जाते. परिणामी, येथे हातगाड्यांची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. 

वीस हजारांहून अधिक हातगाड्यांचा व्यावसायासाठी वापर
शहरात, तसेच जिल्ह्यात येथून हातगाड्यांची विक्री होते. कळवण, देवळा, नाशिक, मनमाड, सटाणा, नामपूर, काेपरगाव, येवला आदी ठिकाणी मालेगावच्या हातगाड्यांना प्रामुख्याने मागणी आहे. लॉकडाउन व कोरोना काळात या व्यवसायालाही ५० टक्क्यांपेक्षा अधिक झळ बसली आहे. एक गाडी बनविण्यास एका कारागिराला दोन ते तीन तास लागतात. एक हातगाडी तयार होण्यासाठी सहा हजार रुपये मजुरीसह खर्च येतो. हातगाडीला लागणारी चाके मुंबई व इंदोर येथून येतात. कमानी इंदोरहून मागविल्या जातात. फळी मालेगावच्या वखारीतून खरेदी केली जाते. शहरात महिन्याकाठी ५० ते ६० हातगाड्या तयार होतात. त्यात ३० टक्के हातगाड्या या शहरात विकल्या जातात. 

ही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

हातगाडीच्या प्रेमात सामान्य व्यावसायिक

रमजान महिन्यात हातगाड्यांना मागणी वाढते. शहरातून व बाहेरगावाहून पोटपाण्याची खळगी भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना यंत्रमाग चालविता येत नसल्याने ते हातगाडीवरील व्यवसाय निवडतात. स्वस्त व लगेच उपलब्ध होणाऱ्या हातगाडीच्या प्रेमात सामान्य व्यावसायिक पडला आहे. रमजान व दिवाळीच्या सुमारास शहरातील प्रत्येक चौकात हातगाड्यांवर फळे, खजूर, नानपाव, सुका मेवा, सुतरफेनी, कपडे, खाद्यपदार्थ यांची विक्री केली जाते. या वेळी हातगाड्यांना मागणी वाढते. 

शहरात यंत्रमागाशिवाय दुसरे कुठलेही काम नाही. त्यामुळे येथील हजारो नागरिक हातगाड्यांवर व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मागणीनंतर आम्ही लगेचच हातगाडी बनवून देतो. 
-अब्दुल रहीम संचालक, रजा ठेला मार्ट, मालेगाव 
 
शहरात पुरेसे काम मिळत नाही. हातगाडीवर भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. हातगाडी हेच येथील गरिबांचे दुकान व शोरुम आहे. 
-अफसर शेख, भाजीपाला विक्रेता  

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा