मालेगाव एक्साईजचे छापासत्र, तिघांना अटक

मालेगाव,www.pudhari.news

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा; अमली पदार्थ विरोधी जनजागरण चळवळ व्यापक करुन अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात मोहीम उघडली. मालेगाव तालुक्यातील सौदाणे, आघार तसेच बागलाण तालुक्यातील औंदाणे या गावातील हातभटटी निर्मिती व विक्री केंद्रावर छापेमारी झाली. किराणा दुकान, टपऱ्यांवर अवैध मद्य विक्री करणाऱ्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले. तसेच मालेगाव – नामपूर रोडवरील अवैधरीत्या मद्यप्राशन करण्यास परवानगी देणाऱ्या हॉटेल व ढाबे चालकांना तंबी देण्यात आली. संबंधित हॉटेलमालकांकडून मद्यसेवन करण्यास परवानगी देणार नसल्याबाबत हमीपत्र घेण्यात आले.

कारवाईत २४,७६५ रुपये किंमतींचा दारुबंदी गुन्ह्यातील मुददेमाल आढळुन आला. दारु निर्मितीसाठी लागणारे रसायन, प्लॅस्टिक ड्रम, लोखंडी ड्रम, तयार गावठी दारु, चाटु जागेवरच नष्ट करण्यात आला. त्यामध्ये देशी दारू ५.७६, गावठी दारु ५५ लिटर, रसायन ७६५ लिटरचा समावेश आहे. तिघांना अटक होऊन त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान ,मालेगाव तालुक्यातील अधिकृत मंजुर ताडी दुकानास अचानक भेटी देउन सखोल निरीक्षण करून ताडीचे नमुने घेण्यात आले. हे नमुने हाफकिन प्रशिक्षण संशोधन व चाचणी संस्था मुंबई येथे पाठविण्यात येणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दशरथ जगताप, दुय्यम निरीक्षक हर्षराज नामदेव इंगळे. पी. एस. कडभाने तसेच सहायक दुय्यम निरीक्षक वंदना देवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा :

The post मालेगाव एक्साईजचे छापासत्र, तिघांना अटक appeared first on पुढारी.