मालेगाव तालुक्याची आरोग्य यंत्रणाच आजारी! तब्बल ४० टक्के कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

दाभाडी (जि. नाशिक) :  मालेगाव तालुक्याच्या ग्रामीण जनतेची आरोग्य सुविधाच अपुऱ्या मनुष्यबळामुळे आजारी पडली आहे. तालुक्यात तब्बल १२१ पदे रिक्त असल्याची गंभीर बाब समोर आली. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील कार्यरत कर्मचारी आरोग्याचा गाडा अक्षरशः ओढत आहेत. उद्दिष्टपूर्तता करण्यासाठी अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार ढकलत कसरत करावी लागत आहे. पंचायत समितीवर राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेची पकड असतानाही रिक्त अत्यावश्यक सेवेतील पदांची परवड चिंतेचा विषय बनला आहे. 

मालेगाव तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ५० आरोग्य केंद्रांवर विविध ३३९ पदांपैकी १२१ रिक्त पद रिक्त आहेत. २१८ कर्मचारी हा गाडा ओढत आहेत. त्यातच आगामी दोन महिन्यांत आठ कर्मचारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. ४० टक्के कर्मचारी पदे रिक्त असूनही तालुका आरोग्य विभाग जनतेला आरोग्य सुविधा पुरवत आहे. यंत्रणेवरील ताण तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना नियमितपणे कोविड, नॉनकोविड सुविधांसह बीसीजी, पेंटाव्हॅलंट, ओरल पोलिओ, आयपीव्ही, रोटा व्हायरल, गोवर रुबेला, व्हिटॅमिन-ए आदींची लसीकरण मोहीम, गरोदर मातांना लसीकरण, टीडी, कोरोना (आरटीपीसीआर व रॅपिड) तपासणी, शाळांसह अन्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या कोविड तपासणी मोहीम, क्षयरोग, कुष्ठरोग्याची नियमित तपासणी व उपचार, असंसर्ग आजारांच्या तपासण्या, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया या कामाचे नियोजन आरोग्य केंद्र व उपकेंद्रांत सतत सुरू असते. या केंद्रात विविध आजारांची नियमित तपासणी आणि औषधोपचार ही नित्याचीच जबाबदारी पार पाडली जाते. सार्वत्रिक लसीकरणासाठी सर्वांना व उपचारासाठी गरिबांना या यंत्रणेशिवाय अन्य पर्याय नाही. मात्र अचूक व तत्काळ सुविधा पुरविण्यासाठी शासनमान्य पदेच रिक्त असल्याने कार्यरत कर्मचारी ‘मुकी बिचारी कुणीही हाका’ या न्यायाने आरोग्याचे ओझे वाहत आहेत. कर्मचाऱ्यांची वानवा असतानाही कोरोनाकाळात मालेगाव महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला आठ कर्मचारी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले होते. 

 हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

मालेगाव पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आहे. सत्तेची सूत्रे हाती असतानाही तालुका आरोग्य विभागात तब्बल ४० टक्के रिक्त जागा चिंतेचा विषय बनला आहे. ग्रामीण जनतेला तत्पर सेवा मिळण्यासाठी रिक्त जागा भराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. 
 
रिक्त पदांच्या पूर्ततेची मागणी वरिष्ठ पातळीवर करण्यात आली आहे. कर्मचारी उपलब्धतेनुसार गरज पूर्ण केली जाते. उपलब्ध मनुष्यबळाचा नियोजनबद्ध वापर करणे क्रमप्राप्त आहे. 
-डॉ. शैलेश निकम, तालुका आरोग्याधिकारी, पंचायत समिती, मालेगाव 

तालुक्याच्या जनतेला रिक्त पदांचा फटका बसणार नाही याची काळजी घेतली जाते. मात्र शासनाने रिक्त पदांचा प्रश्न तत्काळ निकाली काढावा. 
-अरुण पाटील, सदस्य, पंचायत समिती, मालेगाव 

हेही वाचा - लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..