मालेगाव तालुक्यात भुसे-हिरेंचे वर्चस्व सिद्ध; तरुणांची जोरदार मुसंडी

मालेगाव (नाशिक) : तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींची मतमोजणी सोमवारी (ता. १९) शांततेत झाली. तालुक्यात कृषिमंत्री दादा भुसे यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले. त्याच वेळी रावळगाव, खाकुर्डी, ढवळेश्‍वर, टेहेरे या मोठ्या ग्रामपंचायतींत युवानेते अद्वय हिरे गटाने वर्चस्व राखले. या वेळी निवडणुकीत ८० टक्के उमेदवार तरुण होते. यामुळे विजयाचा वेगळाच जल्लोष जाणवत होता. ढवळेश्‍वर, वनपट, वळवाडे या तीन ग्रामपंचायतींत चार ठिकाणी उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी पद्धतीने कौल काढण्यात आला. 

गुलाल उधळून ठिकठिकाणी जल्लोष 

तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर १६ टेबलांवर सकाळी दहाला तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्या देखरेखीखाली मतमोजणीला सुरवात झाली. प्रत्येक फेरीत १६ गावांची मतमोजणी झाली. या गावांचे मतदानयंत्र प्रत्येक टेबलावर टप्प्याटप्प्याने पोचविण्यात येत होते. त्याच वेळी संबंधित गावांच्या मतदान प्रतिनिधींना पोलिस ओळखपत्र पाहून आत सोडत होते. मतमोजणी केंद्रात मोबाईल नेण्यासाठी बंदी असल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. यामुळे विजयानंतर आकडेवारी घेऊन मतमोजणी प्रतिनिधी बाहेर गेल्यानंतरच विजयाचा जल्लोष होत होता. प्रत्येक फेरीसाठी पाऊण तासाचा कालावधी लागला. दुपारी साडेतीनला मतमोजणी संपुष्टात आली. विजयी उमेदवार पॅनलच्या नेत्यांसह कृषिमंत्री दादा भुसेंचे संपर्क कार्यालय, तसेच युवानेते अद्वय हिरे यांच्या संपर्क कार्यालयात भेट देऊन आनंद साजरा करत होते. पोलिस परेड मैदान, साठफुटी रोड, कॉलेज रोडवर गुलालाचा सडा पडलेला होता. 

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

प्रस्थापितांचे वर्चस्व कायम 

तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांनी आपापले गड राखले. माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर हिरे, मविप्र संचालक डॉ. जयंत पवार, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, युवानेते पवन ठाकरे, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील, बाजार समितीचे संचालक संग्राम बच्छाव, अमोल शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत वाघ, अलका आखाडे, माजी पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, टीडीएफचे जिल्हाध्यक्ष आर. डी. निकम यांनी आपापल्या गावातील वर्चस्व कायम राखले. त्याच वेळी पंचायत समितीचे माजी सभापती धर्मा पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पवार, चंदनपुरीचे माजी सरपंच राजेंद्र पाटील यांना मात्र झटका बसला.  

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क