मालेगाव दुष्काळी पट्ट्यात तब्बल दशकानंतर फुलला गहू! समाधानकारक जलसाठ्याचा परिणाम

निमगाव (जि. नाशिक) : मालेगाव तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यातील निमगाव व परिसरातील २० गावांमध्ये गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसाने तब्बल दशकानंतर गव्हाचे पीक फुलले आहे.

पाण्याअभावी केवळ खरिपाचे पीक घेऊन आठ महिने जमीन ओसाड पडत होती. विहिरी व इतर ठिकाणच्या जलसाठ्यांमुळे यंदा या दुष्काळी माळरानाने रब्बीच्या पिकामुळे जणू हिरवा शालू पांघरला आहे. गहू, हरभऱ्याबरोबरच उन्हाळ कांदालागवड करण्यात आली. काही शेतकऱ्यांनी डाळिंब व द्राक्षांचे क्षेत्र वाढविले आहे. 

निमगावसह परिसरातील १५ ते २० गावे नेहमी दुष्काळी पट्ट्यात राहिली आहेत. पुरेसा पाऊस होत नसल्याने या भागात फेब्रुवारीपासूनच टँकर धावतात. गेल्या वर्षी सरासरीच्या जवळपास दुप्पट पाऊस झाल्याने चित्र एकदम पालटले. खरीप हंगाम जोरात आला. पाठोपाठ रब्बीचे क्षेत्रही वाढले. तब्बल दहा वर्षांनंतर या भागात गव्हाची पेरणी करण्यात आली. पीक काढणीला आले आहे. उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली आहे. रब्बी हंगामामुळे परिसरातील शेती अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. मार्च उजाडला तरी या भागात यंदा पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. विहिरींना बऱ्यापैकी पाणी आहे. त्यामुळे फळपिकांबरोबरच उन्हाळ कांद्याचे उत्पादन वाढू शकेल. 

 हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

परिसरात गव्हाच्या उत्पन्नात वाढ झाल्याने बळीराजा सुखावला आहे. हरियाना, पंजाब आदी राज्यांमधून गहू काढण्याची यंत्रे दाखल झाली आहेत. सध्या मोठ्या प्रमाणावर मजूरटंचाई आहे. त्यामुळे शेतकरी यंत्राने गहू काढणीला प्राधान्य देत आहेत. गहू काढणीसाठी एकरी दोन ते अडीच हजार रुपये मोबदला घेतला जातो. अनेक ठिकाणी गव्हाची काढणी सुरू झाली आहे. एकरी सरासरी आठ ते दहा पोती उत्पादन येत आहे. 

आपल्या मातीची चपाती मिळणार 

गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने खरीप व रब्बी असे दोन्ही हंगाम घेण्यात आले. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवड करण्यात आली आहे. दहा वर्षांनंतर प्रथमच या भागातील शेतकरी व नागरिकांना आपल्या मातीतील गव्हाची चपाती खायला मिळणार आहे. बाहेरचा गहू विकत घेण्याची गरज भासणार नाही. 

हेही वाचा - लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..

तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यात गव्हाचे पीक दहा वर्षांनंतर पाहायला मिळाले. केवळ बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध असल्याने त्यांना पीक घेता येत होते. यंदा बहुतांशी शेतकऱ्यांनी गव्हाला पसंती दिली आहे. मजूर मिळत नसल्याने यंत्राच्या सहाय्य्याने गहू काढावा लागत आहे. 
-विजय शेवाळे, निंबायती, शेतकरी