मालेगाव : धोक्याचे खड्डे बुजविण्यास आठवड्याचा अल्टिमेटम

मालेगाव,www.pudhari.news

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील सराफ बाजारासह प्रमुख चौक परिसरातील खड्डे बुजविण्याकडे मनपाने दुर्लक्ष केल्याने सोमवारी (दि. 4) सार्वजनिक नागरी सुविधा समितीने आंदोलन केले. आठवड्याभरात खड्ड्यांची समस्या निकाली काढली नाही, तर रामसेतू पुलावर रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला.

सरदार चौक, भांडे गल्ली स्वामिनारायण मंदिर, शिवशक्ती चौक, मोहनपीर गल्ली, कापसे गल्ली, मामलेदार गल्ली, भावसार गल्ली, नेहरू चौक, सराफ बाजार येथे मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्याबाबत फेब्रुवारी 2022 मध्ये मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. पावसाळा सुरू होऊनही त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. सरदार चौकातील गटारावरील लोखंडी जाळी तुटलेली असून, तिचा अंदाज येत नसल्याने व्यापारी, भाजीपाला विक्रेते तसेच शाळकरी मुले तिथे अडखळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रामदास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली मनपाविरोधात सोमवारी सरदार चौक, भांडे गल्ली व शिवशक्ती चौकात ‘खड्डा बनले मौत का कुआ’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रश्नी मनपाला आठवड्याभराचा अल्टिमेटम देण्यात आला. त्यानंतर व्यापारी व नागरिक रामसेतूवर रास्ता रोको करतील, असा इशारा देण्यात आला. कैलास शर्मा, भरत पाटील, फारुक कच्ची, भालचंद्र खैरनार, राजेंद्र तिवारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post मालेगाव : धोक्याचे खड्डे बुजविण्यास आठवड्याचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.