मालेगाव मनपाच्या ४५४ कोटींच्या अंदाजपत्रकास मंजुरी; फेरफाराचे महापौरांना अधिकार

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील मालमत्ताधारकांवर कराचा कुठलाही बोजा न टाकता गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ५५ कोटी रुपये अधिक असलेल्या महापालिकेच्या ४५४ कोटी २८ लाख ८७ हजार २८६ रुपयांच्या अंदाजपत्रकास बहुमताने मंजुरी देण्यात आली. ऑनलाइन महासभेत अंदाजपत्रकीय चर्चेला फाटा देत महापौरांना फेरफाराचे अधिकार दिल्याने विरोधी महागठबंधन आघाडीची उपसूचना फेटाळण्यात आली.

एमआयएमच्या सदस्यांनी सत्तारूढ गटाच्या दडपशाहीचा विरोध करीत सभात्याग केला. मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन, व्यापारी गाळ्यांची भाडेवाढ, बीओटी तत्त्वावरील जागांचा विकास यासाठी उत्पन्नवाढ गृहीत धरली आहे. गेल्या वर्षी ३९५ कोटी ८९ लाखांचे अंदाजपत्रक होते. 

महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. ३१) ऑनलाइन महासभा झाली. उपमहापौर नीलेश आहेर, स्थायी समिती सभापती राजाराम जाधव, उपायुक्त नितीन कापडणीस, रोहिदास दोरकुळकर, नगरसचिव श्‍याम बुरकुल सभास्थानी होते. स्थायी सभापती जाधव यांनी महापौरांना अंदाजपत्रक सादर केले. अंदाजपत्रकात कुठलीही करवाढ नसल्याचे रशीद शेख यांनी सांगितले. नगरसेवक मुश्तकीम डिग्निटी यांनी अंदाजपत्रकाचा अभ्यास करून तीन दिवसांनंतर यावर चर्चा करावी, अशी हरकत घेत उपसूचना मांडली. मात्र सत्तारूढ गटाचे अस्लम अन्सारी यांनी अंदाजपत्रकात फेरफार करण्याचे अधिकार महापौरांना देत अंदाजपत्रक मंजूर करण्याची सूचना मांडली. ४८ विरुद्ध १८ मतांनी सूचना मंजूर करण्यात आली. एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेज यांच्यासह सदस्यांनी सत्तारूढ गटाच्या दडपशाहीचा निषेध करत सभात्याग केला. चर्चेविना गोंधळात बहुमताने अंदाजपत्रक मंजूर झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंदाजपत्रकात जुन्या प्रलंबित कामांचाच समावेश आहे. आस्थापना विभागाच्या नूतनीकरणावर २० लाख रुपये, तर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी ४५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. महात्मा जोतिराव फुले पुतळ्याचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आहे. 

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

मनपा अंदाजपत्रक उत्पन्न खर्च गोषवारा व टक्केवारी 
जमा रक्कम (लाखात) 
जीएसटी अनुदान १६,८०० (३६.९८ टक्के) 
दर व कर २,६१० (६.७५ टक्के) 
मालमत्ता उपयोगिता महसूल ३,०१२ (६.६३ टक्के) 
जलदाय व्यवस्थेमुळे मिळालेल्या रकमा २,४०४ (५.२९) टक्के 
अनुदाने अंशदाने ३९१ (०.८६ टक्के) 
अनुदाने भांडवली जमा ६,९६० (१५.३२ टक्के) 
संकीर्ण ८६१ (१.९० टक्के) 
भाग-३ (असाधारण निलंबन लेखे) ३,६३९ (८.०१ टक्के) 
सुरवातीची शिल्लक ८,७५२ (१९.२७ टक्के) 
-------------------------------------------------------------- 
एकूण जमा ः ४५,४२८ (१०० टक्के) 
-------------------------------------------------------------- 

खर्च - (रक्कम लाखात
सामान्य प्रशासन वसुलीचा खर्च - ७,२३५ (१८.९३ टक्के) 
सार्वत्रिक सुरक्षितता - १,१८४ (२.६१ टक्के) 
आरोग्य व सोयी - ५,४५१ (१२.०० टक्के) 
शिक्षण - ४,३६७ (९.६१ टक्के) 
संकीर्ण व इतर- ३९५ (०.८७ टक्के) 
अंदाजपत्रक - अ भांडवली खर्च - १६,१८० (३५.६२ टक्के) 
अंदाजपपत्रक- क पाणीपुरवठा व ड्रेनेज - ८,२६४ (१८.१९ टक्के) 
भाग- ३ असाधारण ऋण व निलंबन लेखे - २,२८५ (५.०३ टक्के) 
अखेरची शिल्लक - ६८ (०.१५ टक्के) 
-------------------------------------------------------------- 
एकूण खर्च - ४५,४२८ (१०० टक्के)  

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी