मालेगाव महानगरपालिका आयुक्तांविरोधातील अविश्वास ठराव मंजूर 

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी पक्षीय व राजकीय मतभेद विसरुन महानगरपालिका आयुक्त ञ्यंबक कासार यांच्याविरुध्द वज्रमुठ वळली. आयुक्तांविरोधात सत्तारुढ कॉंग्रेस, शिवसेना सदस्यांनी आणलेला अविश्‍वास ठराव सर्वपक्षीय सदस्यांच्या पाठींब्यामुळे ८० विरुध्द ० मतांनी मंजूर झाला. महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी चारला ऑनलाईन झालेल्या विशेष महासभेत हा ठराव मंजूर करण्यात आला.

महापालिकेच्या २१ वर्षाच्या इतिहासात आयुक्तांविरुध्द अविश्‍वास ठराव मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मनपाच्या ५४ सदस्यांनी श्री. कासार यांच्याविरुध्द अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला होता. महापौर ताहेरा शेख यांनी विशेष अधिकारात यासाठी आज विशेष महासभा बोलाविली होती. सभेला राष्ट्रगीताला सुरवात झाली. सुरवातीला एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेज यांनी हरकत नोंदवत आयुक्तांनी सुचविलेले ठराव सत्तारुढ गटाने मंजूर का केले? हे ठराव रद्द कराल का? असा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. महापाैरांनी हरकत फेटाळल्यानंतर ठरावावर मतदान घेण्यात आले.

आयुक्तांविरुध्द अविश्‍वास ठरावाची सूचना माजी महापौर रशीद शेख यांनी आणली. या सूचनेला शिवसेनेचे सखाराम घोडके, भाजपचे सुनील गायकवाड, महागटबंधन आघाडीचे मुश्‍तकीम डिग्निटी आदींनी अनुमोदन दिले होते. विशेष महासभेसाठी पक्ष व गटनिहाय एकत्रित ऑनलाईन महासभेत सहभागी झालेल्या सदस्यांनी कॉंग्रेस, महागटबंधन आघाडी, शिवसेना, भाजप व एमआयएम या क्रमाने नगरसचिवांनी नाव पुकारताच हात उंचावून पाठींबा दिला. एमआयएमच्या भूमिकेविषयी साशंकता होती. मात्र गटनेते डॉ. खालीद परवेज यांच्यासह पाच सदस्यांनी या प्रस्तावाला पाठींबा दिला. ८३ पैकी ८० सदस्यांनी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. विक्रमी बहुमताने ठराव मंजूर झाल्याची घोषणा महापौर ताहेरा शेख यांनी दिली. उपमहापौर निलेश आहेर यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

जनता दलाचे नगरसेवक मुश्‍तकिम डिग्निटी व भाजपचे नगरसेवक मदन गायकवाड यांनी राज्य शासनाला तातडीने ठराव पाठवून २४ तासात आयुक्तांची बदली करावी अशी मागणी केली. महापौरांनी आयुक्तांविरुध्दचा अविश्‍वास ठराव मंजूर झाला आहे. त्यांना आता कुठलेही काम करु देणार नाही अशी घोषणा केली. एमआयएमचे युनूस ईसा, सादिया लईक अहमद हे दोन सदस्य व शिवसेनेचे नारायण शिंदे असे तीन सदस्य आजारपणामुळे विशेष महासभेला अनुपस्थित होते.

मतदान करणारे पक्षनिहाय सदस्य असे :
कॉंग्रेस - २८
महागटबंधन आघाडी - २६
शिवसेना - १२
भाजप - ९
एमआयएम -५
--------------
एकूण - ८०

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ