मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन साठा अंतिम टप्प्यात आहे. गुरुवारी (ता. १५) पहाटेपर्यंत पुरेल एवढाच साठा असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांनी ‘सकाळ’ला सांगितले. यामुळे आरोग्य यंत्रणेसह रुग्ण व त्यांचे नातेवाईक चिंताग्रस्त झाले आहेत.
पहाटेपर्यंत पुरवठा होईल..
कृषिमंत्री दादा भुसे यांनी याची तातडीने दखल घेत, रात्री रुग्णालयात भेट दिली. वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर ते जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रुग्णालयाला बुधवारी (ता. १४) शंभर सिलिंडर प्राप्त झाले. रोज किमान २०० सिलिंडर आवश्यक आहेत. सायंकाळी सातपर्यंत नव्याने १४० सिलिंडरची मागणी पुरवठादाराकडे नोंदविण्यात आली. मात्र त्याने मागणीची पूर्तता करण्यासाठी असमर्थता दर्शविली. यामुळे ही धावपळ सुरू झाली. पहाटेपर्यंत पुरवठा होईल, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा - कोरोनाग्रस्त मातेने घरातच सोडला प्राण; एकटी लेक कारने घेऊन गेली स्मशानात, पाहा VIDEO
खासगी रुग्णालयातही आवश्यक सिलिंडरची कमतरता असल्याचेही समजते. औरंगाबाद येथून खासगी रुग्णालयास पुरवठा होतो. काही रुग्णालयांना बुधवारी तुटवडा जाणवत होता. लिक्विड ऑक्सिजन कमतरतेमुळे ही समस्या निर्माण झाल्याचेही पुरवठादारांनी सांगितले. यावर मार्ग न निघाल्यास रुग्णांना हलविणार तरी कोठे, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
हेही वाचा - संतापजनक प्रकार! पॅकिंग किटअभावी मृतदेह ६ तास पडून; पाचशेचे कीट देतायत हजार रुपयांना, पाहा VIDEO