माळमाथाच्या कापसाला गुजरातमध्ये पसंती! परिसरातून रोज हजारो क्विंटलची वाहतूक 

झोडगे  (नाशिक) : यंदाच्या हंगामात ‘पांढरे सोने’ अशी ओळख असणाऱ्या कपाशी पिकाचे लागवड क्षेत्र १२५ टक्के झाले. मात्र अतिपावसाचा फटका कपाशी उत्पादनावर झाल्यामुळे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांढऱ्या सोन्याचे उत्पादन काळवंडले आहे. त्यातही माळमाथा परिसरात उच्च प्रतीचा कापूस पिकवण्यासाठीचा हातखंडा असल्याने या भागातील कापसाला गुजरातमधील जिनिंग व्यावसायिकांची पसंती मिळून रोज हजारो क्विंटल कापूस पाठविला जात आहे. 

परिसरात कपाशी लागवड क्षेत्रात दर वर्षी वाढ होताना दिसते. यंदाच्या हंगामात १७ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर कापूस लागवडीचा अंदाज असताना प्रत्यक्षात २२ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर कापूस लागवड झाली. त्यामुळे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाच्या विक्री भावात चढ-उतार असला तरी शेतकरी नगदी पीक म्हणून कापसाला पसंती देत आहे. गेल्या वर्षी कापसाला खुल्या बाजारात पाच हजार ६०० रुपये भाव मिळाला. यंदा चार हजार ८००- पाच हजार २०० दराने खासगी कापूस खरेदी होत आहे. साधारणपणे ५० टक्के कापूस उत्पादन कमी झाल्याने व गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाच्या भावात घसरण असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. 

हेही वाचा >> खळबळजनक! तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाची थेट मिळाली डेड बॉडीच; कुटुंबाला घातपाताचा संशय

शासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी सर्व शेतकऱ्यांनी कापूस खरेदी करणे आवश्यक आहे. 
- दारासिंग तुंवर 
प्रगतिशील शेतकरी, पळासदरे 

यंदाच्या हंगामात सुमारे पन्नास टक्के कापूस उत्पादनावर परिणाम झाला असून, अतिपावसाने कापसाच्या प्रतवारीवर परिणाम दिसून येतो. येथील दर्जेदार कापसाला गुजरात व राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परिसरातील कापूस खरेदी करून गुजरात राज्यातील कडी येथील सर्वांत मोठ्या कापूस बाजारपेठमध्ये विक्रीसाठी घेऊन जातो. मात्र कापसाच्या गुणवत्तेचा फटका कापसाच्या दरात होतो. 
- बालाजी बाविस्कर, कापूस खरेदी व्यापारी, झोडगे 

माळमाथा परिसरात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. गावोगावी जाऊन कापूस खरेदी करणारे व्यापारी खेड्या पद्धतीने खरेदी करून कापसाने भरलेले ट्रक गुजरात राज्यातील सुरत, कडी, राजकोट येथील जिंनिग मिलमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येते. ९० ते १०० क्विंटल कापूस भरण्यात येतो. प्रतिदिन साधारणपणे आठ ते दहा वाहने कापूस भरून गुजरातमध्ये जातात. 
- बापू केले, कापूस व्यापारी, झोडगे  

हेही वाचा >> बारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत