माळमाथा परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची वणवण

पंचायत समिती कार्यालय, धुळे

पिंपळनेर(जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा : प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने साक्री पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी नियोजन करण्याचे निवेदन देण्यात आले.

माळमाथा परिसरात पिण्याचे पाणी पुरविण्यात लोकप्रतिनिधी व अधिकारी कमी पडतांना दिसून येत आहे. ही परिस्थिती तातडीने आणि अत्यंत खंबीर राहून बदलायला हवी. पाण्याला आपल्याकडे जीवन म्हटलं आहे. पाण्यावर आपण सगळेच अवलंबून असतो., पण असं असलं तरी अजूनही साक्री तालुक्यांत बहुतेक खेड्यांवर दोन­ ते तीन­ किलोमीटरवरून महिलांना पाणी आणावं लागतं असून काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. पाण्याचे व्यस्थापन, पाणी आडवा पाणी जिरवा किंवा वृक्ष लागवड या संकल्पनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आपल्या साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील भडगांव, नागपूर वर्षाने, दगडी विहीर, रायपूर, घाणेगांव या खेड्यांवर पाणीपुरवठा खुप कमी प्रमाणात होत असल्याने येथील महिलांनी पंचायत समितीच्या आवारात हंडा मोर्चा काढून पिण्याच्या पाण्याची अवस्था बिकट झाल्या बद्दल रोष व्यक्त केला. खेड्यांवरील महिला, मुले, वृध्द, गुरे, ढोरं, पाणी नसल्यामुळे अस्वस्थ असून तरी तात्काळ पंचायत समितीमार्फत वरील गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे असे निवेदनात म्हटले आहे.

लोकप्रतिनिधींना व अधिकाऱ्यांना सालाबादाप्रमाणे या वर्षीही पिण्याच्या पाण्याचे पूर्व नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. पिण्याच्या पाण्याचा मूळ प्रश्न कधी मार्गी लागणार? असा प्रश्न प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका विभाग प्रमुख जयेश बावा यांनी उपस्थित केला असून संघटनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका विभाग प्रमुख जयेश बावा, प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, नाना शेलार, शशिकांत अहिरराव, राहूल नांद्रे, महेश नांद्रे, पदाधिकारी, विविध गावांतील महिला, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा-