“मास्क, सॅनिटायझर वापरा, कोरोनाला दूर ठेवा!” वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाची नागरिकांना आर्त साद 

निफाड (जि. नाशिक) : कुटुंबीयांना कोरोनाने वेढल्यावर केवळ समाजमाध्यमातील संपर्क तेवढा शिल्लक राहतो. संपूर्ण कुटुंब कोरोना आजारातून मुक्त होत असताना या महामारीत वडिलांना गमावल्याचे शल्य व्यक्त करीत वनसगावच्या सुनील शिंदे या युवकाने शासनाचे निर्देश पाळण्याचे भावनिक आवाहन केले. मास्क, सॅनिटायझर वापरावे आणि लसीकरणातून कोरोनाला दूर ठेवावे, अशी आर्त साद त्यांनी घातली आहे. 

निफाड तालुक्यातील वनसगाव येथील सुनील शिंदे व परिवार हे शेती व फोटोग्राफीचा व्यवसाय करतात. गेल्या महिनाभरापासून कोरोनाबाबत प्रबोधन केले जात असल्याने कुटुंबीयांतही मास्क, सॅनिटायझरचा वापर केला जात होता. मात्र, सुनील शिंदे यांचे वडील उमाजी शिंदे यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला अन्‌ शिंदे परिवाराला धक्काच बसला. तत्काळ कुटुंबातील सर्वच सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात सर्वच जण पॉझिटिव्ह निघाल्याने मानसिक खच्चीकरण झाले. शिवाय रुग्णालयात जागा मिळणेही जिकिरीचे होऊ लागले. नाशिक रोड येथील एका रुग्णालयातून कोरोना प्रतिबंधात्मक औषधे घेऊन कुटुंबीयांना घरातच विलगीकरणात ठेवले. मात्र, स्वत: सुनील शिंदे व वडील उमाजी शिंदे याचा एचआरसीटी तपासणीदरम्यान कोरोना स्कोअर अधिक असल्याने रुग्णालयात दाखल होणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मविप्र रुग्णालयात दोघा पिता-पुत्रांना दाखल ‌करण्यात आले. मात्र, त्याच दरम्यान वडील उमाजी शिंदे यांचा मृत्यू झाला.

गावी कोरोनावर उपचार घेणारे विलगीकरणातील कुटुंबीय अन्‌ एकाच रुग्णालयात उपचारार्थ असलेले पिता-पुत्र अशी अवस्थ होती. सुनील शिंदे यांना वडिलांच्या निधनाची बातमी मिळताच धक्का बसला. मात्र, रुग्णालयात दररोज केले जाणाऱ्या उपचारातून सुनील यांनी कोरोनावर मात केली. कुटुंबात परत आल्यावर कुटुंबीयांचा हुंदकाही अनावर झाला ‌होता. कारण, वडील‌ मृत झाले होते अन्‌ सुनील मरणाच्या दारातून सुखरूप परत आले होते. त्यानंतर वडिलांचा दशक्रिया व इतर धार्मिक विधी सुनील यांनी पार पाडले. 

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळब

कोरोना महाभयंकर आजार आहे. या आजाराने कुटुंबाला वेढल्यावर मानसिकता ढासळते. मात्र, आपण जर मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर केला आणि लसीकरण करून घेतले तर आपण व आपला परिवार सुरक्षित राहील. सध्या सर्वत्र ऑक्सिजन बेड, रुग्णालयात जागा, इंजेक्शन, औषधांची विचारणा होत आहे. त्या मुळे आपण प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करून कोरोनापासून दूर राहिले पाहिजे. 
-सुनील शिंदे, शेतकरी, वनसगाव (ता. निफाड) 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश