मास्टरमाइंड पकडला पाहिजे, पवारांच्या धमकी प्रकरणावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

छगन भुजबळ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांना धमकी हे संतापजनक आहे. राज्यात जे-जे सर्वसमावेशक विचार करतात त्यांना मनूपिलावळ त्रास देते, असे म्हणत या सर्वांचा मास्टरमाइंड पकडला पाहिजे. लोकशाहीवर प्रेम करणारे लोक हे कदापि सहन करणार नाहीत, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, शहरात या प्रकरणाचे पडसाद उमटले. नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेसने या धमकी प्रकरणाचा निषेध नोंदवत शहराचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना संबंधित व्यक्तीला त्वरित अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून केली. यावेळी भुजबळ यांनी घटनेचा निषेध नोंदवत या पोकळ धमक्यांना घाबरत नसलो तरी हे संतापजनक आहे. राज्यात दाभोळकर, पानसरे यांचे जीव घेण्यात आले आहेत. राज्य शासन याच्या मुळाशी जात नाही, त्यामुळे मनुवादाची पिलावळ धमक्या देत आहे. या धमक्यांना पवार भीक घालणार नाहीत. ते फुले- शाहू- आंबेडकर- छत्रपती यांचा मुशीतून तयार झाले आहेत, असे सांगितले. यावेळी प्रदेश पदाधिकारी नाना महाले, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, संजय खैरनार, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, मनोहर बोराडे, नाना सोमवंशी, शंकर मोकळ, मनोहर बोराडे, योगिता पाटील यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. 

हेही वाचा :

The post मास्टरमाइंड पकडला पाहिजे, पवारांच्या धमकी प्रकरणावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया appeared first on पुढारी.