माहिती अधिकार टाकल्याने माजी सरपंचाला मारहाण; सुरगाणा तालुक्यातील धक्कादायक प्रकार

अलंगुण (जि.नाशिक) : सुरगाणा तालुक्यातील गटग्रामपंचायत भवाडा येथील माजी सरपंच चिंतामण वाघमारे यांना विकासकामांबाबत माहिती अधिकारातून माहिती मागितल्याने मारहाण झाल्याची घटना बुधवारी (ता. ३) घडली. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांचे निलंबन करण्याची मागणी माजी सरपंच चिंतामण वाघमारे यांनी गटविकास अधिकारी व पोलिस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

सुरगाणा तालुक्यातील भवाडा येथील प्रकार 
निवेदनात म्हटले आहे, की ३ मार्चला पंचायत समितीचे विस्ताराधिकारी  झिरवाळ भवाडा ग्रामपंचायत कार्यालयात कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी आले असता, याचा राग येऊन विद्यमान सरपंच काशीनाथ वाघमारे, ग्रामविकास अधिकारी ठाकरे, सदस्य युवराज लोखंडे, सीताराम पाडवी, रामदास थोरात, नारायण महाले, एकनाथ वाघमारे, गुलाब वाघमारे, प्रभाकर वाघमारे, किसन वाघमारे, बाळू निपुंगे यांनी माहिती अधिकार का टाकला, असा जाब माजी सरपंच वाघमारे यांना विचारत शिवीगाळ व धक्काबुक्की करून ठार मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे हा प्रकार विस्ताराधिकारी झिरवाळ यांच्यासमोर घडला. या प्रकरणाची क्लिप आपल्याकडे असून, त्याद्वारे चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. 

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल 
दरम्यान, न्याय मिळेपर्यंत सुरगाणा पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा माजी सरपंच श्री. वाघमारे यांनी दिला आहे. पोलिसांनी याप्रकरणी सरपंच काशीनाथ वाघमारे व ग्रामविकास अधिकारी ठाकरे यांच्यासह इतर संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा