मित्राला दिली तांदळाची गोणी; पत्नी आणि मुलाकडून पतीच्या मित्राची हत्या

सटाणा (जि.नाशिक) : मित्राला तांदळाची गोणी दिली, या गोष्टीचा राग आल्याने तांदूळ देणाऱ्याच्या पत्नी आणि मुलाने तांदूळ घेऊन जाणाऱ्या पतीच्या मित्रावर हल्ला करून केलेल्या जबर मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बागलाण तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील गांधीनगर (वाठोडा) येथे शुक्रवारी (ता. १९) दुपारी घडली. सटाणा पोलिसांत मायलेकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. काय घडले नेमके?

तांदूळ दिल्याच्या रागातून एकाची हत्या 
नामदेव महाले यांच्या फिर्यादीनुसार, बागलाण तालुक्यातील वग्रीपाडा वाठोडा येथील रहिवासी भीमराव ऊर्फ भिवा महाले (वय ४५) शुक्रवारी गांधीनगर वाठोडा येथे वास्तव्यास असलेले बाबूराव खांडवी या मित्राच्या घरी गेले होते. घरी पोचताच बाबूराव खांडवी यांनी भीमराव महाले यास खांद्यावर तांदळाची गोणी दिली. श्री. महाले तांदूळ घेऊन खांडवी यांच्या घराबाहेर आले असता खांडवी यांचा मुलगा संशयित नामदेव खांडवी आणि पत्नी लीलाबाई खांडवी तेथे आले. लीलाबाईने पती बाबूरावला तुझ्या मित्राला तांदळाची गोणी का दिली, असे विचारत हमरीतुमरी केली.

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

काठीने व लाथाबुक्क्यांनी पोटावर मारहाण

मुलगा नामदेवला सोबत घेऊन पती बाबूरावला मारहाण सुरू केली. मारहाण सुरू असतानाच बाबूराव तेथून पळून गेला. तेथे असलेल्या बाबूरावचा मित्र महाले तांदूळ घेऊन तेथून जात असताना लीलाबाई आणि नामदेव या दोघांनी महाले यांना काठीने व लाथाबुक्क्यांनी पोटावर मारहाण केली. या मारहाणीनंतर त्यांनी महाले यास सायंकाळी सातला जखमी अवस्थेत वग्रीपाडा वाठोडा येथील त्याच्या राहत्या घराजवळ सोडले. शनिवारी (ता. २०) रात्री महाले यांच्या पोटात मारहाणीमुळे जोरात दुखू लागल्याने नातेवाईक त्यांना तत्काळ कळवण येथे उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.  

हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी