मिरची चौक अपघात : खासगी बस जप्त, ३१ बसचालकांवर कारवाई

nashik bus acci.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

औरंगाबाद रोडवर मिरची चौकात आयशर व खासगी बस अपघातात १२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न समोर आला. शहर पोलिसांनी शहराच्या वेशींवर तपासणी नाके उभारून खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारपासून (दि.१४) सुरू झालेल्या तपासणी मोहिमेत ३१ खासगी बसेसवर दंडात्मक कारवाई केली असून, एक बस प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात जमा करण्यात आली आहे.

शनिवारी (दि.८) पहाटे औरंगाबाद रोडवरील सिग्नलवर आयशर व खासगी स्लीपर बसच्या अपघातात बसचालकासह १२ जणांचा मृत्यू झाला. या बसची आसन क्षमता ३० असताना त्यात ५५ जण प्रवास करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे जादा प्रवासी वाहतुकीचा प्रश्न समोर आला. त्यामुळे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी ट्रॅव्हल्स चालक-मालकांची बैठक घेत त्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याची सूचना केली होती. तसेच बेशिस्त चालकांवर नियमित कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. त्यानुसार शहर पोलिसांनी दिंडोरी रोड जकात नाका, पेठ रोड जकात नाका, शिलापूर टोल नाका, शिंदे पळसे टोल नाका, नववा मैल मुंबई-आग्रा, गौळाणे फाटा या सहा ठिकाणी नाकाबंदी करून खासगी बसची तपासणी केली जात आहे. प्रत्येक तपासणी नाक्यावर एक पोलिस अधिकारी, दोन पुरुष व एक महिला अंमलदार तसेच वाहतूक शाखेकडील दोन अंमलदार व प्रादेशिक परिवहन विभागाकडील एक अधिकारी असे पथक तैनात आहे. या पथकाकडून शुक्रवारी व शनिवारी ११७ बसेसची पाहणी करण्यात आली. त्यापैकी ३१ खासगी बसमध्ये जादा प्रवासी, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी या बसचालकांकडून ७६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. तर एक बस जप्त करून ती आरटीओत जमा केली आहे.

सर्व खासगी बसमालक, व्यवस्थापक यांनी काेणत्याही प्रकारे नियमबाह्य प्रवासी वाहतूक करू नये. असे आढळल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. – जयंत नाईकनवरे, पोलिस आयुक्त.

हेही वाचा:

The post मिरची चौक अपघात : खासगी बस जप्त, ३१ बसचालकांवर कारवाई appeared first on पुढारी.