
नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
लासलगाव आगाराची लासलगाव – नाशिक बस मंगळवारी सकाळी ९.३० ला नाशिकच्या मिरची हॉटेल चौकातून जात असताना अचानक बसचे ब्रेक निकामी झाले, परंतु बसचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने जवळपास ७५ ते ८० प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले आणि दहा दिवसांपूर्वी याच ब्लॅक स्पॉटवर झालेल्या भीषण अपघाताची पुनरावृत्ती थोडक्यात टळली.
लासलगाव आगाराची नियमित धावणारी लासलगाव- नाशिक बस ही सकाळी हॉटेल मिरचीच्या समोरून जात असताना तेथेच बसचे ब्रेक निकामी झाले. चालक पी. व्ही. भाबड यांनी प्रसंगावधान दाखवत बस तत्काळ नियंत्रित करत रस्त्याच्या कडेला सुरक्षित नेली. बसमध्ये जवळपास ७५ प्रवासी होते. सुदैवाने चौकात दुसऱ्या बाजूने मोठे वाहन येत नव्हते. याच चौकात दहा दिवसांपूर्वी वाशिमहून मुंबईला चाललेल्या लक्झरी बसला पहाटेच्या सुमारास अपघात होऊन बसमधील १३ प्रवाशांचा जळून मृत्यू झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती भाबड यांच्या प्रसंगावधानाने टळली. भाबड आणि वाहक डी. यू. राठोड यांनी सर्व प्रवाशांना दुसऱ्या बसमधून नाशिकला रवाना केले. मोठी दुर्घटना टाळल्याने प्रवाशांनी या दोघांचे आभार मानले. लासलगाव आगारातील बसेसचा दर्जा अत्यंत खालावलेला असून, अनेक नादुरुस्त बस लांबच्या प्रवासासाठी वापरल्या जातात. कोरोनापूर्वी लासलगाव आगारात ५६ बसेस होत्या. मात्र, आता फक्त ३४ बस सेवेत आहेत. बस आगाराकडून मागणी करूनही नवीन बसेस येत नसल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
हेही वाचा:
- Cyber Crime : हातचालाखीने चोरट्यांनी एटीएममधून स्वतःच्याच खात्यावर डल्ला मारला, बँकेची लाखाला फसवणूक
- दिवाळीच्या मुहर्तावर वाहन खरेदीकडे ओढ … गतवर्षीपेक्षा यंदा दुप्पट वाहन नोंदणी
- ग्लोबल-वेफा फसवणूक प्रकरण : तक्रारीअभावी बोगस कंपन्यांचा तपास थंड
The post मिर्ची चौक : बसचालकामुळे टळली अपघाताची पुनरावृत्ती appeared first on पुढारी.