“मी फक्त तिकडून फिरतोय, मत तुम्हालाच देणार!” चमकोगिरी कार्यकर्त्यांचा उमेदवारांना भावनिक आधार 

नैताळे (जि. नाशिक) : गावातील मित्रप्रेम, भाऊबंदकी, नातेगोते यांची जपणूक व्हावी म्हणून चमकोगिरी करणारे कार्यकर्ते मोठ्या अडचणीत सापडत आहे, म्हणून ‘मी फक्त तिकडून फिरतोय, मत तुम्हालाच देणार आहे’, असे भावनिक उत्तर देऊन कार्यकर्ते आपली सुटका करून घेत आहेत. 

नाशिक जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या निफाड तालुक्यात ६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू आहेत. त्यापैकी दावचवाडी, ओणे, सुभाषनगर, सुंदरपूर, नांदगाव या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ६१ ग्रामपंचायतींमध्ये एक हजार १८८ उमेदवार आपले मत अजमावण्यासाठी निवडणूक लढवत आहेत.

चमकोगिरी करणाऱ्यांपुढे पेच

निफाडचे राजकारण नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात बदल घडवत असते. तालुक्यात सध्या ६५ पैकी पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, ६० ग्रामपंचायतींसाठी निवडणूकप्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर एक हजार १८८ उमेदवार आपले मत अजमावण्यासाठी

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

ठिकठिकाणच्या ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात आहेत. गावात कायमच गुण्यागोविंदाने राहणारे नातेवाईक, भाऊबंद, मित्र, हितचिंतक आता अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या पॅनलकडून उमेदवारी करीत आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते, समर्थकांची फाटाफूट झाली आहे. काही चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अक्षरशः धर्मसंकट कोसळले आहे. कोणाचा प्रचार करावा, कोणाबरोबर प्रचाराला जावे, कोणत्या पॅनलच्या प्रचाराचा नारळ वाढवायला जावे, गेलो नाही तर राग येईल, हे प्रश्‍न असल्याने कार्यकर्त्यांनी शक्कल लढवली आहे. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

मतदारराजाला ओळखणे अवघड 

अलीकडे राज्यात अनेक समाजसुधारक, प्रबोधनकार होऊन गेले. समाजाने कोणाचेच ऐकले नाही; पण कोरोनाने संपूर्ण जगाला जमिनीवर आणले. कोणती व्यक्ती कोणत्या वेळी मदतीला येते किंवा नाही, हे बघायला मिळाले. या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने मतदारराजा हुशार झाला आहे. उमेदवारांकडून आर्थिक फायदा करून घेत वेळेला कोणाच्या पारड्यात आपले मत टाकेल, हे सांगणे कठीण झाले आहे.