‘मी राज्यपाल नव्हे, तर राज्यसेवक आहे’ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

नाशिक : देशाला दात्यांची मोठी परंपरा आहे. समाजातील दात्यांच्या दातृत्वावरच समाज चालत असतो. नॅबचे भव्यदिव्य स्वरूप हे समाजातील 
दात्यांच्या जोरावर उभे राहिले आहे. नॅबला मिळालेल्या दातृत्वाप्रमाणेच शासकीय यंत्रणेत दातृत्वाची दृष्टी येवो. अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह 
कोश्यारी यांनी व्यक्त केली. 

शासकीय यंत्रणला दातृत्वाची दृष्टी लाभो 

कोश्यारी म्हणाले की, देशाला दानशूरांची मोठी परंपरा आहे. दानशूर असतात म्हणून समाज चालत असतो. दातृत्वाची ही भावना टिकून राहणे महत्वाचे आहे. शासनातील प्रशासकीय यंत्रणेला याच दातृत्वाची नितांत आवश्यकता आहे. अशीच दातृत्वाची भावना यंत्रणेत असली तर योग्य होईल. शेकडो देणाऱ्या हातांनी देत जावे. हजारो हातांनी वाटावे. नॅब त्याचे उत्तम उदाहरण आहे. शेकडो लोकांमुळे हजारोना दरवर्षी दृष्टी मिळत असते असेही म्हणाले. सातपूर औद्योगिक वसाहतीतील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब) च्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाचे भूमीपूजन आज राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. नॅबचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, संस्थापक अध्यक्ष देवकिसन सारडा, महासचिव गोपी मयूर, माजी अध्यक्ष अशोक बंग आदी व्यासपिठावर होते. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

...म्हणून मी पहिला 

प्रस्ताविकात राज्यपाल कोश्यारी हे नॅबला भेट देणारे पहिले असल्याचा उल्लेख झाला त्यानुषंगाने राज्यपाल म्हणाले की, आतापर्यंत राज्यपाल झाले. मी राज्यपाल नसून राज्यसेवक आहे. त्यामुळेच बहुदा नाशिकला नॅबच्या कार्यक्रमाला येणारा पहिला राज्यपाल असेल. अशा शब्दात त्यांनी इतरांपेक्षा वेगळा असल्याचे सांगितले. 

देणगीदारांचा सन्मान 

तत्पूर्वी, त्यांच्या हस्ते नॅब इमारतीतील दिव्यांग्याच्या वस्तीगृहाचे भूमीपूजन झाले. तसेच दिव्यांगासाठीच्या संवेदना उद्यानाची तसेच नॅबच्या वर्गाची तसेच ब्रेल लायब्ररी, विविध उपकरणांची त्यांनी पाहणी केली. त्यांच्या हस्ते ३६ वर्षापूर्वी नॅबच्या स्थापनेत पुढाकार असलेल्या संस्थापक अध्यक्ष देवकिसन सारडा यांचा हद्य सत्कार करण्यात आला. तसेच नॅबच्या राहूल चांडक, अशोक बंग, सुभाष लोया, सुरेश केला, मधुबाबू काबरा, संध्या मयूर आदी देणगीदारांना तसेच सुवर्णपदक विजेत्या वेदांत मुंदडा या विद्यार्थ्याचा राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

अध्यक्ष कलंत्री यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या वाटचालीची माहीती दिली. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नॅबचे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, राजेंद्र कलाल आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. गोपी मयुर यांनी आभार मानले.