मुंढेगाव चित्रपटसृष्टीसाठी जागा मंजूर करावी, दादा भुसे यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी

दादा भुसे, विखे पाटील,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील चित्रपटसृष्टीच्या उभारणीसाठी जागा मंजूर करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. यासंदर्भात ना. भुसे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पत्र दिले आहे. पुरवणी अधिवेशनामध्ये चित्रपटसृष्टीचा विषय मार्गी लागणार असल्याचे भुसे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

नाशिक शहराला अभिनयाचा मोठा वारसा लाभलेला आहे. शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चित्रपट तसेच मालिकांचे चित्रीकरण सुरू असते. अनेक कलावंत नाशिक शहराने दिले आहेत. त्यामुळे नाशिकला चित्रपटनगरी असावी, अशी मागणी कलावंतांसह नाशिककरांनी पालकमंत्री भुसे यांच्याकडे केली आहे. ना. भुसे यांनी ही बाब सकारात्मक घेत मुंढेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टीला मंजुरी मिळावी याकरिता महसूलमंत्री विखे-पाटील यांना पत्र दिले आहे.

मुंढेगाव येथे ४७ हेक्टर ३९ आर जागेवर दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टी नगरी प्रस्तावित आहे. यासाठी ना. भुसे यांनी पाठपुरावा केला आहे. जागेच्या मागणीचा प्रस्ताव नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागास त्रुटी पूर्ततेसह सादर केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर या प्रस्तावाला मंजुरी मिळावी, यासाठी भुसे प्रयत्नशील आहेत. त्यानुसार पुरवणी अधिवेशनातच जागा मंजुरीसाठी भुसे हे आग्रही आहेत. दरम्यान, जिल्ह्यात चित्रपटनगरी झाल्यास स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. तसेच स्थानिक कलावंतांनादेखील वाव मिळणार असल्याने नशिकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

हेही वाचा :

The post मुंढेगाव चित्रपटसृष्टीसाठी जागा मंजूर करावी, दादा भुसे यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी appeared first on पुढारी.