मुंबईच्या धर्तीवर नाशिक शहरातील वाहतुकीस लागणार शिस्त

वाहतूक पोलिस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील बहुतांश रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील अपघातप्रवण क्षेत्रातील सुरक्षेसाठी पोलिसांनी अनेक बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मुंबई पोलिसांची कार्यपद्धती अभ्यासली जाणार असून, त्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांशी चर्चा केली आहे. त्यानुसार लवकरच 50 वाहतूक अंमलदार मुंबईत पाठवण्यात येणार आहेत. तिथे हे अंमलदार मुंबई पोलिसांसोबत काम करून प्रशिक्षण घेतल्यावर त्याची अंमलबजावणी नाशिकमध्ये करणार आहेत.

पोलिस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी वाहतुकीसंदर्भात माहिती दिली. शहरातील मुंबईनाका, द्वारका, सारडा सर्कल भागातील वाहतूक कोंडीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मुंबई पोलिसांप्रमाणे नाशिकला काम केले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलिस, महापालिका, आरटीओ, न्हाई या संस्थांनी एकत्रित येत शहराच्या वाहतूक व्यवस्थेची पाहणी करीत आवश्यक सूचना करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्यासाठीही उपाययोजना केल्या जात असल्याचे नाईकनवरे यांनी सांगितले. वाहतूक अंमलदारांना मुंबईच्या धर्तीवर आता प्रशिक्षित केले जाणार आहे.

मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा केली असून, नाशिकमधील अंमलदार काही दिवस मुंबईला पाठवणार आहोत. हे अंमलदार मुंबईतील वाहतुकीचे नियोजन अभ्यासतील. या प्रशिक्षणातून नाशिकच्या वाहतूक सुरक्षेसाठी त्याचा फायदा होईल.
– जयंत नाईकनवरे, पोलिस आयुक्त

हेही वाचा :

The post मुंबईच्या धर्तीवर नाशिक शहरातील वाहतुकीस लागणार शिस्त appeared first on पुढारी.