मुंबईपेक्षा नाशिकमध्ये कोरोनाचे अधिक बळी; चिंताजनक बाब

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांच्‍या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूच्‍या प्रमाणातही वाढ झालेली आहे. बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्राच्‍या तुलनेत नाशिक जिल्ह्यात मार्च महिन्‍यात कोरोनामुळे झालेल्‍या मृत्‍यूंची संख्या अधिक राहिली आहे. तर मंगळवारी (ता. ९) मुंबई क्षेत्रात कोरोनामुळे दोन बळी गेलेला असताना नाशिक जिल्ह्यात नऊ बाधितांचा मृत्‍यू झाला. दरम्‍यान, दिवसभरात ५४७ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले असून, बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या ३५८ आहे. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत १७९ ने वाढ झालेली आहे. 

बाधितांच्‍या संख्येत झपाट्याने वाढ
नाशिक जिल्ह्यात मंगळवारी झालेल्‍या नऊ मृत्‍यूंपैकी आठ मृतांचे वय साठपेक्षा जास्त आहे. नाशिक शहरातील चार, नाशिक ग्रामीणचे तीन तर, मालेगाव महापालिका क्षेत्रातील दोघांचा मृत्यू झाला. नाशिक शहरात म्‍हसरुळ येथील ७३ वर्षीय महिला, डिसुझा कॉलनीतील ७३ वर्षीय पुरुष, चेतनानगर येथील ७६ वर्षीय पुरुष, सातपुर कॉलनीतील ६४ वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्‍यू झाला आहे. नाशिक ग्रामीणमध्ये पालखेड (ता. निफाड) येथील ७२ वर्षीय महिला, चांदवड येथील ६८ वर्षीय पुरुष, सिन्नर येथील ६५ वर्षीय महिला बाधिताचा मृत्‍यू झाला. तर, मालेगाव महापालिका क्षेत्रात दयाणे येथील ४० वर्षीय व मालेगाव कॅम्‍प येथील ६७ वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्‍यू झाल्याची नोंद आहे. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

प्रलंबित अहवालांचे प्रमाण पुन्‍हा एकदा वाढले
दिवसभरात आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील ४११, नाशिक ग्रामीणमधील ७१, मालेगावचे ४१ तर जिल्‍हाबाहेरील १४ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. बरे झालेल्या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील २०८, नाशिक ग्रामीणमधील १३८, जिल्‍हा बाहेरील बारा रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्‍यान प्रलंबित अहवालांचे प्रमाण पुन्‍हा एकदा वाढले असून, सायंकाळी उशीरापर्यंत ३ हजार ४९६ संशयित अहवालाची प्रतिक्षा होती. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO

मार्चमध्ये बृहन्‍मुंबईत ३७ मृत्‍यू 
मार्च महिना सुरु झाल्‍यापासून नाशिकमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या वाढलेली आहे. गेल्‍या नऊ दिवसांत बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रात एकूण ३७ बाधितांचा मृत्‍यू झालेला आहे. तर नाशिक जिल्ह्यात याच कालावधीतील मृतांची संख्या ४४ आहे. जिल्ह्यातील मृत्‍यूंमध्ये नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका व नाशिक ग्रामीणमधील सर्व तालुक्‍यांचा समावेश आहे.