मुंबई-आग्रा महामार्गाने प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री! टोल दरवाढीमुळे डोकेदुखी

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गाने  प्रवास करणाऱ्यांसाठी ‘बॅड न्यूज’ आहे. कोरोनाने अगोदर नोकरी-व्यवसायाला घरघर लागलेली असताना वाहनानुसार ५ ते ७५ रुपयांची वाढ होणार असल्याने चालकांचे बजेट कोलमडणार आहे.

टोल दरवाढीमुळे डोकेदुखी

मुंबई-आग्रा महामार्गाने पिंपळगाव बसवंत मार्गाने प्रवास करणार असाल तर तुमच्या खिशाला कात्री बसणार आहे. करवाढीमुळे वाहनांची संख्या पाहता रोज एकूण एक लाख रुपये अतिरिक्त वसुली होणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांच्या मोफत सवलतीला कात्री लावण्याची मुजोरी टोल प्रशासनाने केली आहे. १ एप्रिलपासून करवाढीचा बोजा वाहनचालकांवर पडणार आहे. याविरोधात लवकरच सर्वपक्षीय आंदोलन टोलप्लाझावर घडण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

एप्रिल फुल’च्या मुहूर्तावर होणारी ही करवाढ 
इंधन दरवाढीने, तर खासगी वाहनांतील प्रवास परवडत नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत पिंपळगावच्या पीएनजी टोलप्लाझाने नव्या आर्थिक वर्षापासून करवाढीचा घाट घातला आहे. पिंपळगाव टोलप्लाझाची पथकर वसुलीचे कंत्राट सध्या इंगल इन्फ्रा कंपनीकडे आहे. जुन्या पथकरांच्या दरानुसार रोज सुमारे २० लाख रुपये पथकर वसुली होते. नव्याने होणाऱ्या आकारणीनुसार यात रोज एक लाख रुपयांची वाढ होणार आहे. सुमारे ५ ते ७५ रुपयांपर्यंत दरवाढीची अमंलबजावणी गुरुवार (ता.१)पासून होणार आहे. ‘एप्रिल फुल’च्या मुहूर्तावर होणारी ही करवाढ वाहनचालकांचा खिसा खाली करणारी ठरेल. 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

सर्वपक्षीय आंदोलनाचा इशारा 
स्थानिक वाहनधारकांना २८५ रुपये मासिक पास देण्याचे प्रस्तावित केले आहे. पथकर वसुलीविरोधात पिंपळगाव शहरात रोष आहे. स्थानिकांकडून पासच्या माध्यमातून करवसुलीचा प्रस्ताव मागे न घेतल्यास टोल प्लाझावर सर्वपक्षीय आंदोलन धडकण्याचा इशारा देण्यात आला.