मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाट्यावर भीषण अपघात; दोन दुचाकीस्वार जागीच ठार 

मालेगाव (जि.नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असलेल्या चाळीसगाव फाट्यावर भरधाव आयशर ट्रकने (एमएच 18 बीजी 0117) दुचाकीला (एमएच 19 डीए 4352) जबर धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वार पंकज मुरलीधर पाटील (28, रा. पिंप्री, ता. चाळीसगाव) हा तरुण व त्याच्या समवेत असलेली तरुणी असे दोघे जागीच ठार झाले. धडक जबरदस्त असल्याने तरुणाच्या डोक्याच्या एका भागाचा चेंदामेंदा झाला. मयत तरुणीची ओळख पटू शकली नाही. 

मोबाईल सापल्याने पटली तरुणाची ओळख

अपघातानंतर जमाव मारहाण करेल, वाहनाचे नुकसान होईल या भीतीपोटी ट्रकचालक द्रोणागिरी गोसावी (रा. अवधान, जि. धुळे) काही अंतरापर्यंत पुढे निघून थांबला. त्याला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. अपघाताचे वृत्त समजताच पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कैलास गुजर, पोलिस शिपाई सचिन दळवी, अक्षय पाटील, शरद मोगल व सहकारी घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते शफीक अहमद व नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून मृतदेह सामान्य रुग्णालयात पाठविले. दुचाकीच्या नंबर प्लेटचा चुराडा झाला होता. पोलिसांनी क्रमांक जुळवणी करुन उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे माहिती घेतली. अपघातग्रस्तांचा मोबाईल मिळून आला. यानंतर मृत पंकजची ओळख पटली. त्याचा भाऊ चंद्रभान पाटील याने पंकज अविवाहीत असल्याचे सांगितले. यामुळे पाटील कुटुंबिय घटनास्थळी आल्यानंतरच मृत तरुणीची ओळख पटू शकेल. तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

माजी आमदार आसिफ शेख यांचा रास्तारोको 

महामार्गावर गेल्या दोन आठवड्यापासून सातत्याने अपघातांची मालिका सुरु आहे. यामुळे आजच्या अपघातानंतर चाळीसगाव फाट्यावरील संतप्त जमावाला सोबत घेत चाळीसगाव फाटा व अपघातग्रस्त ठिकाणांवर गतीरोधक करावेत या मागणीसाठी माजी आमदार आसिफ शेख यांनी रास्तारोको आंदोलन सुरु केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास विस्कळीत झाले. महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी गतिरोधक तातडीने करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलना दरम्यान महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. चाळीसगाव फाट्यावर मोठी गर्दी झाली होती. तालुका पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट