मुंबई महामार्गावर आमदार खोसकर यांची गांधीगिरी; गुलाबपुष्प देऊन वाहनचालकांचे स्वागत 

घोटी ( जि. नाशिक) : मुंबई - नाशिक महामार्गावर पिंपरी फाटा येथे सोमवारी (ता. २५) सकाळी साठेआठला वाहतूक सप्ताहानिमित्त आमदार हिरामण खोसकर यांनी गांधीगिरी करत वाहनचालकांना गुलाबपुष्प देऊन वाहन चालवताना काळजी घ्यावी, असा सल्ला दिला व महामार्ग घोटी केंद्र पोलिसांच्या कार्याचा गौरव केला. 

महामार्ग घोटी केंद्र पोलिसांतर्फे गेल्या आठवड्यापासून वाहतूक सप्ताह साजरा होत आहे. मोक्याच्या ठिकाणी जाऊन नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. आग लागलेल्या वाहनातून प्रवाशांना जिवंत बाहेर काढून त्यांना सुरक्षितस्थळी हलविणे, सीटबेल्ट लावणे, वाहतुकीचे नियम पाळणे आदी सूचना व प्रात्यक्षिक केले जात आहे. या कार्याची दखल घेत आमदार खोसकर यांनी वाहतूक सप्ताहाच्या पाचव्या दिवशी गांधीगिरी करत वाहनचालकांना गुलाबपुष्प देत वाहतुकीचे नियम पाळण्याच्या सूचना केल्या. थेट आमदारांच्या हस्ते गुलाबपुष्प स्वीकारताना अनेकांनी सेल्फी घेतल्या.

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

महामार्ग पोलिसांचे काम कौतुकास्पद

किसान सभेच्या शेतकरी मोर्चाचे यशस्वीपणे वाहतूक नियंत्रण करत सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, याची महामार्ग पोलिसांनी घेतलेली काळजी कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी महामार्ग घोटी केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कौस्तुभ पवार, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापक टॉम थॉमस, कैलास ढोकणे, सुरक्षा अधिकारी हरीश चौबे, बीकेएस युनियनचे अध्यक्ष अर्जुन भोसले यांसह महामार्ग पोलिस कर्मचारी उपस्थित होते. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच