‘मुक्त’च्‍या बारा अभ्यासक्रमांना युजीसीची मान्‍यता; विद्यापिठाच्या दोन वर्षांच्‍या पाठपुराव्‍याला यश

नाशिक : राज्‍यभरात विस्‍तार असलेल्‍या यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या दोन वर्षांच्‍या पाठपुराव्‍याला यश आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) यांच्‍यातर्फे मुक्‍त विद्यापीठाच्‍या बारा अभ्यासक्रमांना मान्‍यता दिली आहे. यात बीबीए या पदवी अभ्यासक्रमासह विज्ञान शाखेतील विविध विषय व कला शाखेतून भाषेसमवेत अन्‍य विषयांत पदव्‍युत्तर पदवी शिक्षणाची संधी विद्यार्थ्यांना उपलब्‍ध होणार आहे. 

मान्‍यता मिळालेल्‍या बारा अभ्यासक्रमांकरीता लवकरच प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्‍यान, युजीसीच्‍या मार्गदर्शक सुचनांनुसार फेब्रुवारी-मार्च २०२१ करीता प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतीम मुदत ३० एप्रिलपर्यंत आहे. प्रवेश निश्‍चितीबाबतची माहिती युजीसीला कळविण्याची मुदत १५ मेपर्यंत निश्‍चित करण्यात आली आहे. मराठी विषयातील पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रम (एमए-मराठी) यासह विविध अभ्यासक्रमांच्‍या मान्‍यतेसाठी मुक्‍त विद्यापीठामार्फत काही कालावधीपासून विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार युजीसीने नुकतेच मान्‍यतेसंदर्भात पत्रक जारी केले असून, यात बारा अभ्यासक्रमांना मान्‍यता दिल्‍याचे नमूद केले आहे.

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

फेब्रुवारीच्‍या शेवटच्‍या आठवड्यात झालेल्या तज्‍ज्ञ समितीच्या बैठकीत आढावा घेतल्‍यानंतर खुल्‍या व दूरशिक्षण पद्धतीकरीता देशभरातील विविध इन्‍स्‍टिट्यूशन, विद्यापीठांना अभ्यासक्रमांसाठी मान्‍यता देण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठासह देशभरातील तेरा विद्यापीठांच्‍या विविध अभ्यासक्रमांना युजीसीने मान्‍यता दिलेली आहे. चार वर्षांकरीता अर्थात्‌ २०२४-२५ पर्यंत ही मान्‍यता ग्राह्य असेल. त्यानंतर पुन्‍हा आवश्‍यक बाबींची पूर्तता करताना मान्‍यतेकरीताची मुदत वाढविता येईल. 
 
मान्‍यता मिळालेले अभ्यासक्रम असे- 

बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्‍ट्रेशन, बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांसह मराठी, हिंदी, उर्दु आणि पब्‍लीक ॲडमिनिस्‍ट्रेशन, अर्थशास्‍त्र, जर्नालिझम ॲण्ड मास कम्‍युनिकेशन या विषयातील मास्‍टर ऑफ आर्टस्‌ पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमास मान्‍यता मिळाली आहे. तर मास्‍टर ऑफ सायन्‍स या पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांतर्गत झुऑलॉजी, बॉटनी, रसायनशास्‍त्र, भौतिकशास्‍त्र, गणित या विषयांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्‍ध असेल. 

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

मुक्‍त विद्यापीठाच्‍या पाठपुराव्‍याला यश आले आहे. बारा अभ्यासक्रमांना युजीसीची मान्‍यता मिळाली असून, लवकरच या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. कला, विज्ञान शाखेतून पदव्‍युत्तर पदवी शिक्षणाची संधी राज्‍यभरातील विद्यार्थ्यांना उपलब्‍ध होणार असून, या संधीचा लाभ घ्यावा. 
-डॉ. ई. वायुनंदन, कुलगुरु, यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ.