मुक्या जनावरांच्या जीवाशी खेळ! १३ मेंढ्यांचा मृत्यू; पस्तीस अत्यवस्थ  

ओझर (जि.नाशिक) : ओझरच्या सोनेवाडीतील घटना असून अक्षरश: मुक्या जनावरांच्या जीवाशी खेळ झालेला आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. अचानक १३ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. २२) घडली. ३० ते ३५ मेंढ्या अत्यवस्थ असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नेमके काय घडले?

१३ मेंढ्यांचा मृत्यू; पस्तीस अत्यवस्थ
चंदूशेठ नामक व्यक्तीचा तेलाचे डबे धुण्याचा व्यवसाय आहे. डबे धुतल्यानंतर हे पाणी शेतात वाहून जाते. हेच पाणी दत्तू देवराम पल्हाळ व संदीप पल्हाळ यांच्या मेंढ्यांनी प्यायल्याने १३ मेंढ्या मृत झाल्या. सुमारे ३५ मेंढ्या अत्यवस्थ झाल्या. पशुवैद्यकीय अधिकारी वानखेडे यांनी मेंढ्यांवर उपचार सुरू केले आहेत. दरम्यान, संशयित चंदूशेठ हा रिकामे तेलाचे डबे औषधाने स्वच्छ करून ते पुन्हा तेल गिरण्यांना विक्री करतो. त्यास ग्रामपालिकेने कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही. डबे केमिकलने स्वच्छ केल्यानंतर ते पाणी परिसरातून वाहते. त्यामुळे दुर्गंधी येत असल्याचे सोनेवाडीचे ग्रामस्थ सांगतात. अनेकदा सूचना देऊनही त्याने ऐकले नाही, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

संशयितांवर गुन्हा दाखल
घटनेचे वृत्त समजताच तलाठी उल्हासराव देशमुख यांनी पंचनामा केला. दरम्यान, मेंढ्यांचे मालक दत्तू पल्हाळ व संदीप पल्हाळ यांनी आमची गुजराण व कुटुंब मेंढ्यांवरच अवलंबून असून, शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी मेंढपाळांनी केली आहे. या प्रकरणी ओझरचे पोलिस निरीक्षक अशोक रहाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

सोनेवाडी येथील डबेवाल्याच्या व्यवसायास ग्रामपंचायतीने कोणतीही परवानगी दिलेली नाही व तशी नोंद नाही. या घटनेबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल. 
-यतीन कदम, जिल्हा परिषद सदस्य