मुक्‍त विद्यापीठाच्या एमबीए प्रवेशासाठी ३० नोव्‍हेंबरपर्यंत मुदतवाढ 

नाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील एमबीए प्रथम वर्ष शिक्षणक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत प्रवेश प्रक्रिया दिलेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीसाठी ३० नोव्‍हेंबरपर्यंत मुदत असणार आहे. 

मुक्‍त विद्यापीठाच्‍या एमबीए अभ्यासक्रमाच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी गेल्‍या १५ ऑक्‍टोबरपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ऑनलाइन प्रवेश घेण्यासाठी १५ नोव्‍हेंबरपर्यंत मुदत दिलेली होती. परंतु संपूर्ण राज्‍यात सुरू असलेल्‍या कोविड-१९ च्‍या वाढत्‍या संसर्गाच्‍या पार्श्वभुमिवर शिक्षणक्रमाच्‍या ऑनलाइन अर्जासाठी ३० नोव्‍हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या शिक्षणक्रमाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असलेल्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज वाढीव मुदतीत आपल्‍या अभ्यासकेंद्रामार्फत निश्‍चित करावा असे विद्यापीठाने स्‍पष्ट केले आहे. 

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

एमबीए प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असलेल्‍या विद्यार्थ्यांनी त्‍यांच्‍या लॉगीनमधून अपलोड डॉक्‍युमेंट या लिंकवर क्‍लिक करून अभ्यासकेंद्र निवडायचे आहे. व त्‍याप्रमाणे आलेल्‍या लिंकमधून आपले पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. डॉक्‍युमेंट अपलोड व स्‍टडी सेंटरची निवड झाल्‍यानंतर निवडलेल्‍या अभ्यासकेंद्राला आपले कागदपत्र पडताळणी करून प्रवेश निश्‍चित करण्याबाबत कळविण्याचे स्‍पष्ट केले आहे. स्‍टडी सेंटरने अप्रुवल दिल्‍यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्‍या लॉगीनद्वारे शुल्‍क भरण्याची प्रक्रिया राबवायची आहे. असे विद्यापीठातर्फे स्‍पष्ट केले आहे. 

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?