मुख्याधिकाऱ्यांवर राजकीय हेतूने आरोप; सत्ताधारी महिला नगरसेविकांचे पत्र  

सिन्नर (जि.नाशिक) : नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार महिला नगरसेविकांना अपमानास्पद वागणूक देतात, असा करण्यात आलेला आरोप दबावतंत्रासाठी व राजकीय हेतूने करण्यात आला असल्याचा आरोप सत्ताधारी महिला नगरसेविकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. एकीकडे मुख्याधिकाऱ्यांकडून कामे करून घेतली जातात व दुसऱ्या बाजूला त्यांचे मनोबल कमी करण्यासाठी त्यांच्यावर व्यक्तिगत आरोप केले जातात. हे सगळे राजकीय षडयंत्र असल्याचे पत्रकात म्हटले आहे. 

सत्ताधारी महिला नगरसेविकांचे पत्र 
मुख्याधिकारी केदार यांची मुदतपूर्व बदली करण्याचा प्रयत्न यापूर्वी राजकीय हेतूने करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करून ही बदली रद्द केली. त्यामुळे केदार यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर, बदनामीकारक आरोप केले जात असल्याचे या नगरसेविकांनी म्हटले आहे. कुठल्याही प्रकारे सत्ताधारी व विरोधक असे भेदाभेद न करता मुख्याधिकारी चांगले काम करत असताना वातावरण गढूळ करण्यासाठी जाणीवपूर्वक असत्य आरोप केले जात आहेत.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

त्यामुळे मुख्यधिकारी यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्याचे थांबवावे, असेही पत्रकात म्हटले आहे. पत्रकावर मंगला शिंदे, सुजाता भगत, विजय बर्डे, नलिनी गाडे, प्रतिभा नरोटे, ज्योती वामने, प्रणाली गोळेसर आदी नगरसेविकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.  

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच