‘मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचाही खून करा’; मेसेजवर कारवाईची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एका सदस्याने बँकेच्या ‘एमडीचा मर्डर करून टाका, जेलमध्ये जाऊ’ तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचाही खून करा, अशा आशयाचे मेसेज टाकल्याचे उघड झाले आहे. यामुळे बँकेच्या सरव्यवस्थापकांनी भद्रकाली पोलिसांकडे तक्रार अर्ज देत कारवाईची मागणी केली आहे.

एनडीसीसी सरव्यवस्थापक संजय पाटील यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार, बँकेवर प्रशासक म्हणून प्रतापसिंह चव्हाण यांची नेमणूक केली आहे. बँकेत तात्पुरते काम करणाऱ्या ४०० कर्मचाऱ्यांचा ‘एनडीसीसी२०१६ बॅच’ असा व्हॉट्सअप ग्रुप आहे. या ग्रुपवर कर्मचाऱ्यांमध्ये संवाद होत असतो. दरम्यान, तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात औद्योगिक न्यायालयात दावा होता. मात्र न्यायालयाने कर्मचाऱ्यांची दावा फेटाळल्याने काही कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात रीट पिटीशन दाखल केली आहे. ही याचिका प्रलंबित असून या प्रश्नावर काही कर्मचारी व्हॉट्सअपवर चर्चा करत होते. त्यावेळी एका कर्मचाऱ्याने बँकेचे प्रशासक चव्हाण व मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांचा खून करून टाका असा मेसेज टाकला आहे. खुन करून जेलमध्ये जाण्याची देखील तयारी असल्याचे व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकणाऱ्याने लिहले आहे. धमकीचे मेसेज ज्या मोबाइल क्रमांकावरून टाकण्यात आले त्या मोबाइल क्रमांक धारकाची माहिती पाटील यांनी तक्रार अर्जात दिली आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या धमकीमुळे चव्हाण व पाटील यांच्या जीवास धोका होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी मेसेजची चौकशी करून तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी तक्रार अर्जात करण्यात आली आहे.

बँक ठेवीदारांचे पैसे दिले जात नाही. बँकेचा परवाना धोक्यात आला आहे. आपली बँक आधीच संकटात आहे. तिला बाहेर काढण्यासाठी दिवसरात्र सगळे अधिकारी-कर्मचारी मेहनत घेत आहे. या सगळ्यात कर्मचाऱ्यांनी संयम ठेवणे आवश्यक आहे. जे कर्मचारी याबाबत चर्चा करतात त्या कर्मचाऱ्यांचे प्रकरण न्यायालयात सुरु आहे. त्यावर बँकेचे प्रशासन काहीच करु शकत नाही. – प्रतापसिंह चव्हाण, प्रशासक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक.

हेही वाचा: