मुद्रांक घोटाळा प्रकरण : मुख्य सूत्रधार आला शरण; मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

देवळा (जि.नाशिक) :  मुख्य सूत्रधार असलेला मुद्रांक विक्रेता एक महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्या जामीन अर्जावर मंगळवारी (ता. १६) जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती, पण जामीन न मिळाल्याने अखेर तो पोलिसांना शरण आला.
 

अखेर तो पोलिसांना शरण

या प्रकरणी तपासाला आता गती मिळाली असून, अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दुय्यम निबंधक माधव महाले यांनी १३ फेब्रुवारीस दिलेल्या फिर्यादीनुसार मुद्रांक विक्रेता वाघ, बापू वाघ व इतरांवर देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर हे दोन्ही संशयित फरारी होते. गेल्या आठवड्यात शेतजमीन स्वतःच्या नावावर करून घेणारा बापू रामचंद्र वाघ (रा. झाडी, ता. मालेगाव) याला देवळा पोलिसांनी अटक केली होती. मात्र, मुख्य सूत्रधार असलेला मुद्रांक विक्रेता वाघ एक महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता.

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

त्याच्या जामीन अर्जावर मंगळवारी (ता. १६) जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती, पण जामीन न मिळाल्याने अखेर तो पोलिसांना शरण आला. त्याला दुय्यम निबंधक कार्यालयातून जुना मुद्रांक व बनावट दस्तऐवज प्रमाणित करून त्याची सत्यप्रत काढून देण्यास, तसेच बनावट मुद्रांक बनविण्यास कुणी मदत केली, अशा अनेक प्रश्‍नांची उकल होणे आता सोपे जाणार आहे. तसेच बनावट दस्तऐवज व सत्यप्रत याद्वारे शेतजमीन परस्पर हडप करण्याच्या प्रकरणात झालेल्या आर्थिक देवाणघेवाणीचाही उलगडा होणार आहे. 

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

२० मार्चपर्यंत पोलिस कोठडी

मुद्रांक घोटाळ्याप्रकरणी महिन्यापासून मुख्य सूत्रधार असलेला मुद्रांक विक्रेता चंद्रकांत ऊर्फ गोटू देवाजी वाघ (रा. गिरणारे, ता. देवळा) मंगळवारी (ता. १६) रात्री उशिरा कळवण पोलिसांना शरण आला. त्याला अटक करून बुधवारी (ता. १७) कळवण न्यायालयात उपस्थित केले असता, न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.