मुलीच्या शिक्षणासाठी गरीब दिव्यांग बापाची तळमळ प्राथमिक शिक्षकाने अचूक हेरली! पंचक्रोशीत कौतुक

येवला (जि.नाशिक) : जिल्हा परिषदेच्या शाळेचे उपशिक्षक एका सायकल दुकानात उभे असताना त्यांनी एक दिव्यांग व्यक्ती आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी तळमळ लक्षात आली.. त्यांची परिस्थिती बेताची असल्याचे त्यांना जाणवले. त्यानंतर मदतीला धावलेल्या शिक्षकाच्या कृत्याने पंचक्रोशीत त्यांचे कौतुक होताना दिसत आहे.

बापाची तळमळ सरांनी अचूक हेरली

रेंडाळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे उपशिक्षक सचिन वावळ एका सायकल दुकानात उभे असताना त्यांनी एक दिव्यांग व्यक्ती आपल्या मुलीसाठी जुनी सायकल खरेदी करण्यासाठी आल्याचे बघितले. त्यांची परिस्थिती बेताची असल्याचे त्यांना जाणवले. भरउन्हात वीस किलोमीटरवरून स्वतःची सायकल चालवत आलेली ही व्यक्ती पूर्ण घामाघूम झालेली होती. त्यांच्या परिस्थितीकडे बघून दुकानदारही त्यांना प्रतिसाद देत नव्हता. हे चित्र पाहिल्यानंतर सचिन वावळ यांच्यातील गुरुजी जागा झाला व त्यांनी विचारपूस केली. शिक्षणासाठी रोज सहा किलोमीटर पायी जाणाऱ्या लेकीसाठी सायकल खरेदी करणाऱ्या बापाची तळमळ सरांनी अचूक हेरली व त्यांची चौकशी केली असता, जुनी सायकल खरेदीसाठीसुद्धा त्यांची परिस्थिती नसल्याचे समोर आले.

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

अवघ्या तासाभरात सर्व शिक्षकांचा भरभरून प्रतिसाद

आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी एका गरीब दिव्यांग बापाची तळमळ पाहून त्यांना मदत करण्याचे आश्‍वासन दिले. शिक्षकांच्या एका ग्रुपवर त्यांनी मदतीचे आवाहन केल्यानंतर अवघ्या तासाभरात सर्व शिक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि एकाच दिवसात हडप सावरगाव येथील पालक दत्तू कोल्हे यांच्या मुलीला शिक्षणासाठी नवीन सायकल खरेदी केली. गटविकास अधिकारी उन्मेष देशमुख व गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांच्या हस्ते कोटमगाव देवीच्या प्रांगणात ही सायकल दिव्यांग मुलीला देण्यात आली. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

धनदांडग्या पालकांपेक्षा विचाराने नक्कीच श्रीमंत
पुरुषी मानसिकतेने ग्रासलेल्या समाजात आजही मुलींच्या शिक्षणाकडे पाहिजे तितके लक्ष पालक देताना दिसत नाहीत. पण, दत्तू कोल्हे यांचा विचार व तळमळ सर्व समाजाला आदर्शवत अशी आहे. स्वतःची परिस्थिती लेकीच्या शिक्षणात अडसर ठरू नये म्हणून धडपडणारा हा बाप मुलगी आहे म्हणून मध्येच शिक्षण सोडायला लावणाऱ्या अनेक सुदृढ धनदांडग्या पालकांपेक्षा विचाराने नक्कीच श्रीमंत आहे, असे गौरवोद्‌गार गटशिक्षणाधिकारी वाघमारे यांनी काढले. 

लेकीच्या शिक्षणासाठी हे गुरुजन धावून आले

सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी वर्गणी जमा करून एका गरीब दिव्यांग मुलीच्या शिक्षणातील अडचण दूर केली आहे. सावित्रीच्या लेकीच्या शिक्षणासाठी हे गुरुजन धावून आले असून, लोकवर्गणीतून त्यांनी हा आधार दिला आहे. 

या वेळी सचिन वावळ, एकनाथ घुले, किरण पेंडभाजे, चंद्रकांत जानकर, किरण जाधव, दिनेश मानकर, संतोष मुंडे, ज्ञानेश्‍वर पायमोडे, राजू गांगुर्डे, विकास राठोड, अजित मुळे, अंबादास शेकडे, संतोष सोनवणे, जयसिंग पिंपळे, गोपाळ तिदार, श्री. राजोळे, महादेव खरात, आजिनाथ आंधळे, सुभाष काटे, सुरेश तागड, विलास बांगर, कमलेश शिरोरे आदींसह शिक्षक उपस्थित होते.