मुलीला वर्दीत बघायचे आई-बापाचे स्वप्न अखेर साकार! जिद्द आणि मेहनतीला ग्रामस्थांचा सलाम

जळगाव नेऊर (जि. नाशिक) : आई-बाप शेतकरी त्यातच घरची परिस्थिती हालाखीची, कसलाच क्लास न लावता स्वतःच्या हिमतीवर अभ्यास सुरू केला. त्या कष्टकरी आई- वडिलांच्या डोळ्याचे पारणे तेव्हा फिटले जेव्हा पंधरा महिने यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करून ती वर्दीत घरी परतली. त्याच्या जिद्द आणि मेहनतीला शलाम ठोकत कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी तीचे जल्लोषात स्वागत केले. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१७ मध्ये झालेल्या पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी पात्र ठरलेल्या वाहेगाव भरवस (ता. निफाड) येथील तेजल आहेर हिचे नाशिक येथे महाराष्ट्र पोलिस अकादमीत पंधरा महिने यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करून मंगळवारी (ता. ३०) दीक्षान्त सोहळ्यानंतर रात्री उशिरा घरी आगमन झाले. 

दररोज १२ तास आभ्यास

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तेजल आहेर यांनी स्वयंअध्ययन करून शेतीकाम सांभाळून पोलिस उपनिरीक्षकपदास गवसणी घातली. नाशिकला ७ जानेवारी २०२० ला प्रशिक्षणास प्रारंभ केला. मध्यंतरी आलेल्या कोरोना संकटामुळे प्रशिक्षण लांबल्याने पंधरा महिने प्रशिक्षण चालले. आई-वडिलांचा शेती व्यवसाय असल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची, प्रतिकूल असली तरीही आई- वडिलांचे नेहमी पाठबळ लाभले. नाशिकला दोन वर्षे कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता अभ्यास सुरू केला. पेपरच्या कालावधीत रात्रंदिवस १२ तास अभ्यास करावा लागत असे. मुलीला वर्दीत बघायचे आई-वडिलांचे स्वप्न अखेर साकार झाले. 

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

वडील हौशीराम आहेर, आई अलका आहेर, मामा राजेंद्र शेळके, भाऊ स्वप्नील आहेर, बहीण मयूरी आहेर, हृषीकेश आजगे, सिद्धार्थ वावधाने, लक्ष्मण आहेर, भास्कर आहेर, शंकर आहेर, रामचंद्र आहेर, दशरथ आहेर आदी उपस्थित होते. बुधवारी (ता.३१) जळगाव नेऊर (ता. येवला) येथील संस्कृती पैठणीतर्फे पोलिस उपनिरीक्षकपदी मुंबई येथे नियुक्ती झालेल्या तेजल आहेरचा सत्कार झाला. संस्कृती पैठणीचे संचालक सोमनाथ तांबे, गणेश तांबे, सचिन ठोंबरे, संतोष शिंदे, नितीन चव्हाणके, राहुल तांबे, हनुमान शिंदे, सुनील मखरे, शीतल सोनवणे, नितीन वाघ, प्रमोद सूर्यवंशी, रावसाहेब ठोंबरे आदी उपस्थित होते. मार्च २०१९ मध्ये एमपीएससीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत तेजल आहेरचा समावेश झाला होता. त्या वेळी संस्कृती पैठणीचे संचालक गोविंद तांबे यांच्या हस्ते तिचा भव्य सत्कार करण्यात आला होता. 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

एमपीएससी स्पर्धा परीक्षा तयारी करणे खडतर आहे. प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द, मेहनतीने अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते. पंधरा महिन्यांत आयुष्याचे सार घेऊन महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनी कायम हृदयात घर करून राहणार आहे. 
-तेजल आहेर, पोलिस उपनिरीक्षक