मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात लवकरच बैठक – भुजबळ

 

नाशिक : मुस्लिम संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवार (ता.१८) राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. विविध मागण्यांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्‍वासन भुजबळ यांनी दिले. 

मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात लवकरच बैठक
उच्च न्यायालयाने मान्य केलेले मुस्लिमांचे शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण कायम करण्यात यावे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुस्लीम विद्यार्थी व विद्यार्थींनीसाठी स्वतंत्र वसतीगृह स्थापन करण्यात यावे, सारथी संस्थेच्या आधारावर मुस्लीम समाजासाठी संस्था स्थापन करण्यात यावी. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा. मुस्लीम युवकांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळास निधी उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच मुस्लीम समाजाच्या सुरक्षेसाठी अॅट्रोसिटीच्या धरतीवर कायदा तयार करावा.

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

अशा विविध मागण्या भुजबळ यांच्या पुढे मांडण्यात आल्या. यावेळी मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष अजीज पठाण, पदाधिकारी मुशताक शेख, इब्राहीम अत्तार, जाकीर शेख, मुख्तार शेख, कय्युम शेख, मुख्तार शेख, इम्तियाज पिजार्स आदी उपस्थित होते.  

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..