मुस्लिम कारागिराच्या हस्तकलेतून देखण्या कलेची प्रचीती! पैठणीच्या पदरावर साकारले राधाकृष्णाचे मनमोहक चित्र

येवला (जि.नाशिक) : कलेला बंधने नसतात अन् धर्मही. कला सर्व मर्यादांना ओलांडून आपले देखणे रूप आकार देते व कलाकार जीव ओतून या सौंदर्याला नवं रूप देतो... या देखण्या कलेची प्रचीती येथे आली, ती मुस्लिम पैठणी कारागिराच्या हस्तकलेतून... या अवलिया कलाकाराने पैठणीच्या पदरावर राधाकृष्णाची प्रतिकृती साकारत वेगळेपण जपले आहे. 

मुस्लिम विणकराने साकारले मनमोहक राधाकृष्णाचे चित्र 
अस्सल सौंदर्य व कशिदाकारीमुळे कलात्मक परिधान केलेली स्त्री शंभरात उठून दिसते, एवढी या महावस्त्राची ताकद! येवला म्हटलं, की डोळ्यासमोर उभी राहते ती पैठणी. पैठणीचे वेगवेगळे प्रकार तयार होत असले तरी अस्सल पैठणीचा बाज टिकवून ठेवण्याचा प्रयत्न इथल्या प्रत्येक कलाकाराचा आहे. 
येथील काही हौशी तरुण विणकरानी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिर्डीचे साईबाबा आणि अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आदींची प्रतिमा पैठणीवर साकारली, तर गेल्या आठवड्यात एका विणकराने हरीण, जिराफाची चित्ररूपी पैठणी साकारली. हिंदू- मुस्लिम ऐक्याच्या अनेक घटना आणि प्रसंग आपण आजूबाजूला घडताना पाहतो. मग एखादं संकट असो किंवा सणवार, विविधतेने नटलेल्या परंपरेचे दर्शन आपल्याला घडतच असते. येवल्यातील वसीम सय्यद या मुस्लिम पैठणी कारागिराने आपल्या कलाकुसरीतून पैठणीच्या पदरावर राधाकृष्ण झोका खेळत असतानाचे चित्र साकारले आहे.

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

पैठणीला ऑनलाइन मागणी वाढली

त्याच्या या कलाकारीने या वस्त्राचे रूप अधिकच देखणे झाले आहे. 
याबाबत वसीम म्हणतो, की वीस वर्षांपासून मी पैठणीचे काम करतो. आत्तापर्यंत भरपूर पैठणीमधल्या साड्या विणल्या आहेत. माझी परिस्थिती नसल्यामुळे मी इतरत्र विणकाम करायचो. आता मी स्वतः घरी माग टाकला असून, पैठणीला ऑनलाइन मागणी वाढली आहे. विणकाम करताना आपण काहीतरी कला जोपासावी, या उद्देशाने राधाकृष्णाची प्रतिमा मी विणली व अनेकांना ती भावली. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

२० ते २५ दिवसांत पूर्ण केली
यापूर्वी राजवंश, अस्वली, पोपट, ब्रॅकेट मोर आदी डिझाइनमध्ये पैठण्या विणल्या आहेत. ऑनलाइन ऑर्डर घेऊन किंवा बाहेरच्या ऑर्डर घेऊन मी घरी माग टाकला आहे. मला राधाकृष्ण झोपाळ्यावर बसलेल्या पैठणीची ऑर्डर आली होती. झोपाळ्यावर बसलेले राधाकृष्ण झोका खेळत असल्याची ही साडी २० ते २५ दिवसांत पूर्ण केली.